आकांक्षित तालुका कार्यक्रमात सुरगाणा तालुक्याची देशपातळीवर मोठी झेप

आकांक्षित तालुका कार्यक्रमात सुरगाणा तालुक्याची देशपातळीवर मोठी झेप
- Advertisement -


३८८ वरून थेट ७७ व्या क्रमांकावर; आरोग्य, पोषण, कृषी व पायाभूत सुविधांमध्ये उल्लेखनीय प्रगती

देशातील ५१५ आकांक्षित तालुक्यांमध्ये सुरगाणाची ३८८ वरून थेट ७७ व्या क्रमांकावर झेप

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे सातत्यपूर्ण मॉनिटरिंग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांचा नियमित साप्ताहिक आढावा

आरोग्य, पोषण, कृषी व पायाभूत सुविधांमध्ये राज्य आणि राष्ट्रीय सरासरीपेक्षा सरस कामगिरी

जिल्हा नियोजन समितीकडून ७ कोटी रुपयांनंतर आणखी ५ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची तरतूद

सुरगाणा, पेठ, इगतपुरी, कळवण व त्र्यंबकेश्वर तालुक्यांसाठी विशेष ‘तालुका विकास आराखडा’ तयार होणार

नाशिक, दि.३१ जुलै : नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत (Aspirational Block Programme) नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्याने सर्वसमावेशक ३९ मूल्यांकन निर्देशकांमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत देशातील ५१५ तालुक्यांच्या क्रमवारीत ३८८ व्या स्थानावरून थेट ७७ व्या स्थानापर्यंत उल्लेखनीय झेप घेतली आहे. प्रशासनाचे प्रभावी नियोजन, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सर्व विभागांच्या समन्वित प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर सातत्याने लक्ष ठेवून नियमित मॉनिटरिंग करीत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार हे दर आठवड्याला आढावा बैठक घेऊन विविध निर्देशकांवरील प्रगतीचा आढावा घेत आहेत. कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या (ITDP) प्रकल्प अधिकारी काश्मिरा संखे या नोडल अधिकारी म्हणून कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीचे समन्वयन करीत आहेत.

सुरगाणा तालुक्याने आरोग्य, पोषण, कृषी व पायाभूत सुविधांच्या विविध निर्देशकांमध्ये राज्य आणि देशाच्या सरासरीपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे. गरोदर महिलांची पहिल्या तिमाहीतील (ANC) नोंदणी ९७.५ टक्के, संस्थात्मक प्रसूती १०० टक्के, कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण केवळ ९.५ टक्के, उच्च रक्तदाब तपासणी ८४.९ टक्के आणि मधुमेह तपासणी ९०.८ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे. कार्यरत अंगणवाड्यांमध्ये १०० टक्के पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि ९९.७ टक्के शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच क्षयरोगावरील १०० टक्के यशस्वी उपचार, जनावरांचे १०० टक्के एफएमडी लसीकरण आणि मंजूर उद्दिष्टानुसार १०० टक्के शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे.

तालुक्याच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत मागील आर्थिक वर्षात ७ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. विकासाची गती कायम राखण्यासाठी आता आणखी ५ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

याशिवाय सुरगाणा, पेठ, इगतपुरी, कळवण आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांसाठी विशेष ‘तालुका विकास आराखडा’ (Block Development Plan) तयार करण्यात येणार आहे. या आराखड्याची जबाबदारी नोडल अधिकारी काश्मिरा संखे यांच्याकडे सोपविण्यात आली असून, सर्व संबंधित विभाग आणि घटकांच्या सहभागातून हा आराखडा तयार केला जाणार आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावणे, उपजीविकेची साधने अधिक सक्षम करणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे हा या आराखड्याचा प्रमुख उद्देश आहे.

 

प्रतिक्रिया

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, “आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत सुरगाणाने मिळविलेले यश हे सर्व विभागांच्या समन्वित प्रयत्नांचे फलित आहे. परिणामकारक अंमलबजावणी, सातत्यपूर्ण आढावा आणि लोककेंद्रित नियोजनाच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. सुरगाणासह इतर आकांक्षित तालुक्यांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.”

 

००००



Source link

- Advertisement -