मुंबई, दि. २० : इंडियन पोलीस सर्व्हिस ऑफिसर्स वाइव्ज असोसिएशन ‘आयपीएसओडब्ल्यूए’ यांच्या पुढाकाराने वरळी येथे आयोजित प्रदर्शन व विक्री उपक्रमामुळे विविध स्वयंसेवी संस्था, बचत गट आणि महिला उद्योजकांना आपली उत्पादने सादर करण्यासह त्यांची विक्री करण्याची संधी मिळाली. या उपक्रमातून बचत गटाच्या महिलांना उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत मिळाली आहे.
प्रदर्शनात सहभागी महिला उद्योजकांनी एका दिवसात सुमारे २१ हजार रुपयांची उलाढाल केली. ग्राहकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे महिलांना आर्थिक उत्पन्नासोबतच आत्मविश्वास आणि व्यावसायिक अनुभव मिळण्यास मदत होत असल्याचे अनिर्वेदशक्ती फाऊंडेशनच्या संस्थापक डॉ. आर. विमला (सेवानिवृत्त भा.प्र.से.) यांनी सांगितले. त्यांनी ‘आयपीएसओडब्ल्यूए’च्या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
अनिर्वेदशक्ती फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध बचत गटांनी तयार केलेली दर्जेदार उत्पादने प्रदर्शनात मांडण्यात आली. यामध्ये ओमसाई बचत गटाचे कडधान्य, पंचशील पापड्या, सावित्रीबाई फुले उत्पादक गटाचे तूप व तांदूळ, बिरवाडकर टीचे विविध फ्लेवर्समधील चहा, रायगड येथील कॉफी, हाताने तयार केलेल्या राख्या तसेच लाकडी घाण्यावर काढलेले वूड प्रेस्ड तेल यांचा समावेश होता.
बचत गटातील महिलांना मुख्य प्रवाहातील बाजारपेठेशी जोडण्यासाठी अशा व्यासपीठांची महत्त्वाची भूमिका असून, ग्रामीण व निमशहरी भागातील महिलांनी तयार केलेली उत्पादने शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचणे हे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी ‘आयपीएसओडब्ल्यूए’ च्या अध्यक्ष मनीषा दाते आणि सचिव संजना लाल यांनी पुढाकार घेतला होता.
0000
श्रद्धा मेश्राम/विसंअ









WhatsApp