युनिसेफचा उपक्रमः राष्ट्रीय राजदूत अभिनेता आयुष्मान खुराणा यांची जालना जिल्ह्यातील चांदाई टेपली शाळेला भेट

- Advertisement -


छत्रपती संभाजीनगर, दि. २० (जिमाका)- आपल्या सभोवताली असलेल्या कोणत्याही बालकाचे बालपण जपणे ही समाजाची सामुहिक जबाबदारी आहे. त्यासाठी समाजाने योगदान द्यावे. जालना जिल्ह्यात युनिसेफच्या उपक्रमाचा भाग म्हणून स्थलांतरीत मजूरांच्या मुलांची जबाबदारी गावकरी, नातेवाईकांनी घेतली आहे,हे खरोखर वाखाणण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध अभिनेते आणि युनिसेफचे राष्ट्रीय राजदूत आयुष्मान खुराणा यांनी काढले.

प्रसिद्ध अभिनेते आणि युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत आयुष्मान खुराना यांनी जालना जिल्ह्यातील चांदाई टेपली या गावी स्थानिक शाळेस बुधवारी (दि.19) भेट दिली. येथे शिकणाऱ्या मुलांशी, त्यांच्या नातेवाईक, ग्रामस्थ व युनिसेफच्या बालमित्रांशी संवाद साधला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्याशी वार्तालाप झाला. त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले. युनिसेफ इंडिया पथकाचे उपप्रतिनिधी यास्पर मोलर, जास्मिन चौधरी, सरपंच शंकर आसाराम आदी उपस्थित होते.

जालना जिल्ह्यातील उपक्रम

युनिसेफच्या माध्यमातून 2014 पासून जालना जिल्ह्यात 258 गावांमध्ये हा उपक्रम राबविला जातोय. रोजगारासाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या पालकांच्या मुलांना स्थलांतर करावे लागू नये. स्थलांतरामुळे त्यांचे आरोग्य, शिक्षण आणि एकूणच बालमनावर विपरित परिणाम होऊ नये म्हणून युनिसेफने हा उपक्रम राबविला आहे.

या उपक्रमात युनिसेफच्या पुढाकारातून स्थलांतरीत पालकांची मुले ही नातेवाईक, आजी आजोबा आणि गावातील विश्वासू नातेवाईकांच्या देखरेखीखाली कुटुंब आधारीत पर्यायी व्यवस्थेत सांभाळली जातात. त्यामुळे ह्या मुलांचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण थांबवण्यात यश आले आहे. त्यांचे आरोग्य चांगले राखण्यातही यश आले आहे. या कामात युनिसेफ मार्फत प्रशिक्षित स्वयंसेवक अर्थात बालमित्र गावात राहून मदत करतात. मुलांच्या खेळ, अभ्यास, आहार, मानसिक आरोग्याची काळजी घेतात. त्यांना विविध उपक्रमांत सहभागी करुन घेतात.

5800 मुलांचे स्थलांतर थांबविण्यात यश

युनिसेफच्या उपक्रमामुळे जालना जिल्ह्यात स्थलांतरानंतर कुटुंब-आधारित पर्यायी व्यवस्थेत राहणाऱ्या मुलांचे प्रमाण सातत्याने वाढून 60.23 टक्क्यांवर पोहोचले आहे. 2026 मध्ये, जालना जिल्ह्यात सहा तालुक्यांमध्ये 649 युवा स्वयंसेवक कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या राज्य स्थलांतर समितीच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आणखी 198 गावांमध्ये विस्तारित करण्यात आला आहे2024-25 मध्ये, पालक हंगामी कामासाठी स्थलांतरित झाल्यावर 5800 हून अधिक मुले आजी-आजोबा किंवा नातेवाईकांकडे राहिली. आजी-आजोबा, इतर नातेवाईक तसेच गावातील विश्वासू रहिवाशांनी सामुदायिकरित्या त्यांची काळजी घेतली. या सहभागामुळे शालेय अनुपस्थिती आणि गळती कमी होण्यास, पोषण व आरोग्य सेवांचा अखंड लाभ मिळण्यास, अधिक सुरक्षित मानसिक-सामाजिक वातावरण निर्माण होण्यास, तसेच बालमजुरी, बालविवाह आणि किशोरवयीन गर्भधारणा रोखण्यास मदत झाली आहे.

श्री. खुराणा म्हणाले की, हंगामी, आर्थिक अडचणींमुळे होणारे स्थलांतर हा स्वखुशीने निवडलेला पर्याय नसून अनेक कुटुंबांसाठी ते कठोर वास्तव आहे.कोणत्याही मुलाला त्याच्या आवाक्यात नसलेल्या परिस्थितीमुळे आपले बालपण गमवावे लागू नये. युनिसेफचा कार्यक्रम केवळ सुरक्षित घर पुरवत नाही तर नातेसंबंधही जपतो, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो आणि मुलांना उज्ज्वल भविष्याची आशा देतो.

श्री. खुराणा पुढे म्हणाले की, युनिसेफने प्रशिक्षित केलेले बालमित्र हे मुलांचे हक्क, सुरक्षितता,शिक्षणात मदत करतात. तसेच बालमजुरी आणि बालविवाह रोखण्यासाठी मदत करतात. त्यामुळे प्रत्येक मुलाला शिकण्याची आणि यशस्वी होण्याची संधी मिळते. भारतात मुलांच्या संरक्षणासाठी बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) सारखे मजबूत कायदे आहेत. बालकांसाठीचे हे संरक्षणात्मक उपाय हंगामी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांसह प्रत्येक मूल आणि इतर कुटुंबापर्यंत प्रत्यक्षात पोहोचतील यासाठी साऱ्यांनी आपले योगदान देणे आवश्यक आहे.

गावपातळीवर हा कार्यक्रम मुलांना कसा आधार देतो हे जाणून घेण्यासाठी खुराना यांनी किशोरवयीन मुली, मुले आणि काही कुटुंबांची भेट घेतली. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक मुलाला सुरक्षित, प्रेमळ आणि पोषक कौटुंबिक वातावरणात वाढण्याचा हक्क आहे. सरकार मुलांच्या संरक्षणासाठी कायदे आणि योजना तयार करते. त्याचवेळी युनिसेफ, महाराष्ट्र सरकार, जिल्हा प्रशासन आणि गावातील रहिवासी एकत्र येऊन प्रत्येक मूल सुरक्षित राहील यासाठी काळजी घेतायेत हे पाहून मला त्यांचा अभिमान वाटतो.

 युनिसेफ इंडियाचे यास्पर मोलर म्हणाले की, सर्वाधिक असुरक्षित मुलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण पुरवण्यात जालना जिल्हा प्रशासनाला साथ देताना युनिसेफला आनंद होत आहे. या सहभागामुळे मुलांवरील हिंसाचार रोखला जाऊ शकतो. मुलांच्या आयुष्यात असलेले धोके वेळीच ओळखणे आणि कुटुंबांना आवश्यक सेवा देणे गरजेचे आहे. तसेच मुलांना सामाजिक संरक्षणाशी जोडण्यासाठी व्यवस्था अधिक बळकट करणेही महत्त्वाचे आहे. या कामासाठी सहकार्य देणाऱ्या आणि प्रत्येक मुलाच्या सुरक्षितता व काळजी या हक्कांसाठी पुढाकार घेणाऱ्या आयुष्मान खुराना यांचेही युनिसेफ मनःपूर्वक कौतुक करते.

खुराना आणि मोलर यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली आणि मुले व कुटुंबांवर या कार्यक्रमाचा होणारा परिणाम याबद्दल कौतुक केले.

०००००

 



Source link

- Advertisement -