Home गुन्हा उझबेकी महिलेवरील बलात्कार प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास सत्र न्यायालयाचा नकार

उझबेकी महिलेवरील बलात्कार प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास सत्र न्यायालयाचा नकार

0

उझबेकी महिलेवरील बलात्कार प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास सत्र न्यायालयाचा नकार

उझबेकिस्तानची नागरिक असलेल्या ३५ वर्षांच्या महिलेवरील बलात्कारप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास सत्र न्यायालयाने बुधवारी नकार दिला. आठ वर्षे या अधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

पोलीस निरीक्षक भानुदास ऊर्फ अनिल जाधव असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून त्याला याआधीच अन्य प्रकरणामुळे सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली असून अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी त्याला अटकेपासून दिलासा देण्यास बुधवारी स्पष्ट नकार दिला. संबंधित महिलेनेही या प्रकरणी हस्तक्षेप अर्ज करत या अधिकाऱ्याच्या जामिनावर निर्णय देण्याआधी आपले म्हणणे ऐकण्याची विनंती केली. त्याला जामीन देण्यासही तिने विरोध केला. तिचा हा अर्ज मान्य करत प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने गुरुवारी ठेवली. त्याच वेळी पोलीस अधिकाऱ्याला अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास मात्र नकार दिला.

या महिलेने केलेल्या आरोपानुसार, या अधिकाऱ्याने सर्वप्रथम तिच्यावर चेंबूर पोलीस ठाण्यात बलात्कार केला होता. व्हिसाच्या मुदतवाढीसाठी ती चेंबूर पोलीस ठाण्यात गेली होती, त्या वेळी शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याने बलात्कार केल्याचे म्हटले आहे.