ऊसतोड मजुरांसोबत पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची दिवाळी साजरी – महासंवाद

    - Advertisement -

    परभणी, दि. ८ (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यंदाची दिवाळी जिंतूर तालुक्यातील ऊस तोड मजुरांच्या पालावर जाऊन अत्यंत साधेपणाने आणि संवेदनशीलतेने साजरी केली, तर दुसरीकडे शासनाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील ३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १६८ कोटींहून अधिकची दिवाळी अग्रीम मदत जमा करत परभणी जिल्ह्यातील शेतकरीवर्गाची दिवाळी आनंदाची केली.

    दिवाळी हा आनंदाचा सण असला तरी सध्याच्या शेतीपुढील आव्हानांमुळे आणि ऊस तोडीसाठी गावोगाव भटकंती करणाऱ्या मजुरांना अनेकदा सणापासून दूर राहावे लागते. ही सामाजिक जाणीव ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते.

    याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज जिंतूर तालुक्यातील आडगाव दराडे परिसरातील ऊस तोड मजुरांच्या पालाला अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी मजुरांच्या चिमुकल्या मुलांना स्वतःच्या हाताने नवे कपडे घातले, फराळाचं वाटप केले आणि त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलवला.

    या दौऱ्यादरम्यान बोलताना, ऊस तोड मजूर आणि शेतकरी कुटुंबांना आपण एकटे नसून शासन सदैव आपल्या पाठीशी आहे याची जाणीव करून देणे हे आपले कर्तव्य असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

    दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये दिवाळी अग्रीम देण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे. ५ नोव्हेंबर २०२६ अखेर राज्यातील ८७ लाख ४५ हजार हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार ३७२ कोटी रुपयांहून अधिकची मदत जमा झाली असून, यात परभणी जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार ३८० पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १६८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी थेट वितरित करण्यात आला आहे. या आर्थिक मदतीमुळे जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांची दिवाळी आज खऱ्या अर्थाने आनंदात साजरी होत आहे. जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांना ही मदत दिवाळी पूर्वी मिळावी यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील होत्या.

    यावेळी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर तथा राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम) म्हणाल्या ” आज दिवाळी सणाचा आनंद ऊस तोड कामगारांच्या सोबत साजरा करताना हे माझे कुटुंब आहेत यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हाच खरा सणाचा आनंद आहे. सरकार नेहमी कष्टकऱ्यांच्या पाठीशी आहे.”

    या संवेदनशील भेटीमुळे आणि थेट बँक खात्यात जमा झालेल्या आर्थिक मदतीमुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असून, प्रशासकीय स्तरावर राबवलेल्या या जनहिताच्या उपक्रमाने परभणी जिल्ह्यातील कष्टकरी वर्गाची दिवाळी आनंदाची झाली आहे.

    ***

    - Advertisement -