ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे पावले

ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे पावले
- Advertisement -


म. टा. वृत्तसेवा, पनवेल

ऑक्सिजन खाटा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे होणारे हाल थांबावेत, यासाठी ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हावे, या हेतूने पनवेल महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्रकल्प महापालिका उभारणार आहे. शुक्रवारी या प्रकल्पाच्या निधीसाठी स्थायी समितीने मंजुरी दिली.

पनवेल महापालिकेची आरोग्य व्यवस्था अत्यंत तोकडी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सिडकोने दिलेले कळंबोलीतील ७२ खाटांचे अद्ययावत रुग्णालय याशिवाय महापालिका पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून आहे. महापालिका क्षेत्र आणि तालुक्यात रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणारा ऑक्सिजन पुरवठा पूर्णपणे खासगी यंत्रणेवर अवलंबून आहे. पनवेलसह जिल्ह्यात असलेल्या कंपन्यांकडून ऑक्सिजन विकत घेऊन रुग्णालयांना पुरविला जातो. सध्या तालुक्यातील ५०पेक्षा जास्त रुग्णालयांना दररोज सुमारे ३५ टन ऑक्सिजन लागते. रुग्णसंख्या वाढली तर ऑक्सिजन पुरवठव्यावरदेखील मर्यादा येऊ शकतात. याशिवाय सिडको पनवेल महापालिकेला ८०० खाटांचे जम्बो रुग्णालय उभारून देणार आहे. महापालिकेने एमजीएम रुग्णालयासोबतही करार केला आहे. या सगळ्यांचा विचार करून पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी ऑक्सिजनच्या बाबतीत इतरांवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एका दिवसाला २० टन ऑक्सिजनची निर्मिती होईल, असा प्रकल्प उभा करण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीत प्रस्ताव मांडण्यात आला होता. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करून महापालिका क्षेत्रातील खासगी, सरकारी रुग्णालयांची गरज भागविल्यास ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, या हेतूने एक कोटी ३५ लाख रुपयांचा खर्च येईल, असा अंदाज आहे. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत या खर्चाला मंजुरी देण्यात आली.

उपजिल्हा किंवा कळंबोली केंद्र येथे प्रकल्प

हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी पनवेल शहरातील उपजिल्हा रुग्णालय किंवा कळंबोलीतील करोना केंद्र येथे पुरेशी जागा असल्यामुळे सोयीचे ठिकाण निवडून प्रकल्प उभारला जाईल, अशी माहिती महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली.



Source link

- Advertisement -