
जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण
–जागतिक महिला दिन औचित्याने यलो बेल्ट प्रमाणपत्रांचे वितरण
जिल्ह्यातील १५ हजारहून अधिक मुलींना यलो बेल्ट
सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात कन्या सबलीकरण उपक्रमातून शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. यातून जिल्ह्यातील 15 हजार 508 मुली यलो बेल्ट परीक्षा पास झाल्या. जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाला आश्वस्त करणारा हा उपक्रम असून यातून मुलींमध्ये आत्मरक्षणाच्या प्राथमिक तंत्रांसह अनुशासन, संयम आणि निर्णयक्षमता निर्माण होईल. कराटे प्रशिक्षणातून मुलींना आत्मविश्वासाचे कवच मिळून यातून खऱ्या अर्थाने कन्या सबलीकरण होत आहे. यलो बेल्ट प्राप्त 15 हजार पैकी एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थिनींनी ब्लॅक बेल्ट मिळवण्यापर्यंत मजल मारावी. त्यासाठी त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
जिल्ह्यातील कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत आयोजित सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थिनींना यलो बेल्ट ग्रेड प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रशासनिक कामांसह सामाजिक उपक्रमांवर भर देऊन मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण उपक्रम राबवल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे विशेष अभिनंदन केले.
दीपायन बँक्वेट हॉल येथे आयोजित या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य समीत कदम, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, पालकमंत्री यांच्या सुविद्य पत्नी अंजली पाटील, जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे, निवासी माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.

कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील 51 शाळामधील 38 हजार 600 विद्यार्थिनींना मोफत कराटे व तायक्वांदो प्रशिक्षण देण्यात आले. गत आठवड्यात त्यातील 15 हजार 508 विद्यार्थिनींनी परीक्षेत पास होऊन यलो बेल्ट मिळवला. त्यांना प्रातिनिधीक स्वरूपात आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यलो बेल्ट प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तायक्वांदो संघटनेचे प्रमुख सुरेश चौधरी व कराटे संघटनेचे प्रमुख हमजेखान मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना हे कराटे व तायक्वांदो प्रशिक्षण देण्यात आले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून व लोकसहभागातून महिला सक्षमीकरणासाठी पुण्यातील 5 हजार मुलींना लाठी काठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. या अनुषंगाने माहिती देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य शासन अनेक उपक्रम राबवत आहे. पुण्यातील 5 हजार मुलींना लाठी काठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांचे एकत्रित प्रात्यक्षिक मे महिन्यात करण्याबाबत नियोजन सुरू आहे. अशा प्रात्यक्षिकांतून समाजात आश्वासक स्थिती निर्माण होईल. वाईट वागणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण होईल. आगामी काळात ही संख्या 50 हजारपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट असून, सांगलीतही मुलींना लाठी काठी प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्याचा मानस व्यक्त करून त्यांनी अशा उपक्रमांतून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे मिळून त्यांची प्रतिकाराची क्षमता वाढेल व त्या स्वसंरक्षणासाठी सिद्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मुलींना शिक्षणातून सक्षम करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, त्या दृष्टीने अनेक योजना राबवण्यात येत आहेत. मुलींना उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी 100 टक्के शुल्क माफी निर्णयामुळे तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या गत वर्षी 28 हजार व या वर्षी 44 हजारांनी वाढली. याचबरोबर मुलींना निर्वाह भत्ताही दिला जातो. आगामी काळात इतर शुल्कही मोफत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, मुलींसाठी कमवा व शिका ही योजना लवकरच राबवण्यात येईल. या योजनेतून प्रतितास 60 रूपये प्रमाणे मुलींना महिन्याला 2 हजार रूपये मिळतील, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार विशाल पाटील म्हणाले, बदलत्या काळाप्रमाणे मुली, बहिणी, माता सक्षम होणे गरजेचे आहे. यासाठी पालकांनीही जुने विचार सोडून मुलींना ताकद दिली पाहिजे. नवीन विचार स्वीकारून मुलींना सक्षम करण्यासाठी मदत केली पाहिजे, हे सांगताना त्यांनी कराटे प्रशिक्षण उपक्रमाचे कौतुक केले. तसेच, भावनिक होत आपल्या दोन्हीही मुलींना याचप्रमाणे सक्षम करण्यासाठी वाटचाल करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, कराटे प्रशिक्षणाचा उपक्रम हा परिवर्तनाचा प्रवास आहे. मुलींना शारीरिक व मानसिक ताकद देऊन त्यांच्यात स्वसंरक्षणाची क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवण्यात आला. यातून मुली भीतीवर मात करू शकतील. संकटाला आत्मविश्वासाने सामोरे जावू शकतील. धैर्य, संयम आणि संकटावेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होईल. विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करता यावे आणि त्यांना स्वसंरक्षणासाठी सक्षम बनवावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेला हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी सतीश कदम आणि विजया यादव, अपर तहसीलदार अश्विनी वरुटे, मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, क्रीडापटू आरती हळिंगळे, विविध शाळांतील विद्यार्थिनी, शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच रोपट्यास जल अर्पण करण्यात आले. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले.
यावेळी महाराजस्व अभियानातील लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात दाखले वाटप करण्यात आले. कराटे प्रशिक्षण घेतलेल्या विविध विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणासाठीची विविध प्रात्यक्षिके मान्यवरांसमोर आत्मविश्वासाने सादर केली.
00000




















WhatsApp