
- शेतीचा आर्थिक ताळेबंद बदलण्यासाठी ‘अॅसेट क्रॉप’वर भर देणे गरजेचे : राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल
रत्नागिरी, दि. ९ (जिमाका): कृषी विद्यापीठांमध्ये होणारे विविध पिकांचे नवे संशोधन, तंत्रज्ञान आणि सुधारित पध्दती कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. शेतकरी सुखी, समाधानी आणि समृद्ध होण्यासाठी कृषी विभाग व कृषी विद्यापीठाने हातात हात घालून काम करावे, असे प्रतिपादन रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या ‘संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती’च्या तीन दिवसीय बैठकीत ते बोलत होते.
वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी आमदार सूर्यकांत दळवी, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी कुलगुरू डॉ. इंद्र मणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कुलगुरू डॉ. विलास खर्चे, अकोला डाॕ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आकोला कुलगुरु डॉ. शरद गडाख, कृषी व सहकार विभागाचे सचिव परिमल सिंह, महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी, सदस्य विनायक काशिद, सुधीर दळवी आदी उपस्थित होते.
कोकणातील शेतकरी स्वाभिमानी व लढवय्या
मंत्री श्री. गोगावले म्हणाले, “कोकणातील शेतकरी सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा यांच्या मधोमध असलेल्या मर्यादित जमिनीत राबतो. निसर्गाची कितीही संकटे आली, तरी कोकणातील शेतकरी कधीही खचला नाही आणि त्याने कधी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला नाही. हा इथल्या मातीचा आणि शेतकऱ्यांचा स्वाभिमान आहे. राज्य शासनाने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले असून शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. फळबाग लागवडीत आणि फळ निर्यातीत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर आहे. कोकणातील आंबा व काजू ही महत्त्वाची पिके आहेत. मात्र, हवामान बदल, मोहर गळणे, फळमाशी व विविध कीड-रोगांमुळे बागायतदारांचे नुकसान होते. विद्यापीठाने विकसित केलेला आंबा फळमाशी ‘सांधा ट्रॅप’ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. याशिवाय फळांमधील साका, डिका व पर्णगुच्छ रोगांवर अधिक प्रभावी संशोधन होणे गरजेचे आहे. आंबा आणि काजूच्या बागांमध्ये मसाल्याची पिके, काळीमिरी व दालचिनी यांसारखी आंतरपिके घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, जेणेकरून मुख्य पिकाचे नुकसान झाले तरी शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न मिळेल.
शेतीतून तरुणांना लाखांचे उत्पन्न मिळावे
“कृषी पदवीधरांनी आणि शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लाखोंचे उत्पन्न मिळवावे आणि स्वतः मालक बनावे. त्यामुळे गावातील तरुणांचे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतीचा आर्थिक ताळेबंद बदलण्यासाठी ‘अॅसेट क्रॉप’वर भर देणे गरजेचे : राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीतून बाहेर पडून बाजाराची मागणी ओळखून ‘अॅसेट क्रॉप्स’वर (नफा मिळवून देणारी पिके) भर दिला पाहिजे. केवळ भरमसाठ उत्पादन घेणे हा उद्देश न राहता, त्यातून शेतकऱ्याला व राज्याला थेट आर्थिक लाभ झाला पाहिजे, असे मार्गदर्शन वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी केले.
राज्यमंत्री अॅड. जयस्वाल म्हणाले, जादा उत्पादन झाल्यामुळे शेतमालाचे दर कोसळतात आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा पिकांचे ‘अॅसेट’ आणि ‘लायबिलिटी’ असे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. कोकणातील काजू, आंबा आणि मसाल्यांची पिके ही प्रामुख्याने ‘अॅसेट क्रॉप’ प्रकारात मोडतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळते आणि राज्याच्या जीडीपीला बळ मिळते.
कृषी विद्यापीठांच्या बजेटमध्ये सुमारे १०० कोटी रुपयांची वाढ करून ती ६३५ कोटी रुपयांच्या घरात नेण्यात आली आहे. ‘विकसित भारत २०४७’ च्या धर्तीवर राज्याचा कृषी आराखडा तयार केला जात आहे. प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, जमिनीचा पोत आणि हवामानानुसार पिकांचे ‘क्रॉप मॅपिंग’ केले जाईल.
*परकीय चलन निर्देशांक (फॉरेक्स इंडेक्स) : कोणत्या जिल्ह्याचा कृषी विभाग देशाला किती परकीय चलन मिळवून देतो, याचे मोजमाप करण्यासाठी जिल्ह्यांचा स्वतंत्र निर्देशांक तयार करण्याचा विचार शासन करत आहे.
* वन्यप्राण्यांचा उपद्रव हे मोठे आव्हान : विदर्भात वाघ, निलगाय तर कोकणात वानरांमुळे पिकांचे होणारे नुकसान हे कृषी विभागासमोरील गंभीर आव्हान आहे. यासाठी आधुनिक व शास्त्रोक्त उपाययोजनांची गरज आहे.
* यांत्रिकीकरणात प्रादेशिक न्याय : कृषी यांत्रिकीकरणासाठी दिले जाणारे अनुदान आणि यंत्रसामग्री जिल्ह्याच्या गरजेनुसार वाटप केली जाईल.
कोकणातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही सातत्य राखले असून, येथील शेतकरी, कर्जबाजारीपणापोटी आत्महत्या करत नाही, ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर व्यवहार्य संशोधन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेला संदेश यावेळी प्रदर्शित करण्यात आला. ते म्हणाले
आज दापोलीमध्ये अतिशय चांगल्या कार्यक्रमाचे आणि महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणच्या निसर्गसंपन्न आणि जैवविविधतेने समृद्ध भूमीत आयोजित या ५४ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आंबा, काजू आणि इतर विविध फळपिकांच्या क्षेत्रात होत असलेले संशोधन निश्चितच कौतुकास्पद आहे.
सध्याचे बदलते हवामान, पाण्याचा ताण, नवीन किडी व रोगांचा प्रादुर्भाव आणि वाढता उत्पादन खर्च ही मोठी आव्हाने आपल्यासमोर आहेत. ही आव्हाने लक्षात घेता, शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शाश्वत शेतीसाठी उपयुक्त ठरणारे नवीन वाण, आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाचा विकास होणे ही काळाची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी या बैठकीतून निश्चितपणे एक महत्त्वपूर्ण दिशा मिळेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
सचिव श्री सिंह यांनीही मार्गदर्शन केले. कुलगुरु डाॕ भावे यांनी प्रास्तविक केले तर कार्यक्रमात उल्लेखनीय संशोधन व कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करुन त्याची पाहणी केली.
0000

WhatsApp