मुंबई दि. ९: देशातील आणि जगातील कर्क रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कुटुंब तसेच देशाकरिता कॅन्सरचे आर्थिक ओझे फार मोठे असते. अनेकदा कुटुंबांना घर, दागिने विकावे लागतात. त्यामुळे कॅन्सरशी लढताना समग्र दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असून रुग्णांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिक, भावनिक व आर्थिक समस्यांचा विचार झाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
पहिले माझे कर्तव्य’ (पीएमके) फाउंडेशनतर्फे कर्करुग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबांना मदत करणाऱ्या वैद्यकीय तसेच बिगर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी व्यक्तींना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘आय इन्स्पायर पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. अण्णा भाऊ साठे सभागृह भायखळा येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल श्री. बैस बोलत होते.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुरेश अडवाणी, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बडवे व अधिष्ठाता डॉ. श्रीपाद बाणावली यांना जीवन गौरव सन्मान देण्यात आला. कॅन्सरवर मात करणाऱ्या महिला तसेच विविध क्षेत्रातील २० कर्करोगयोद्धे यांना यावेळी ‘आय इन्स्पायर पुरस्कार’ देण्यात आले.
गावांमधील लोकांना कर्करोग झाल्याचे समजते तोवर आजार बराच बळावलेला असतो. या दृष्टीने केंद्र सरकारतर्फे ग्रामीण भागात १.५ लाख आयुष्मान आरोग्य मंदिर बनविण्यात आले आहेत. कर्करोगाचे निदान वेळेवर झाल्यास उत्तम उपचार करता येतो, असे राज्यपालांनी सांगितले. लहान मुलांना कर्करोग उपचार घेताना पाहतो तेंव्हा दुःख होते. अशा मुलांना तसेच त्यांच्या मातापित्यांना समाजाने धैर्य देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.
कर्करोगाशी लढताना समाजाची मदत महत्त्वाची – डॉ. सुरेश अडवाणी
कर्करोगाशी लढताना रुग्णांचे तसेच समाजाचे सहकार्य आवश्यक असते. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून कर्करोगावर मात करता येऊ शकते, असे कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुरेश अडवाणी यांनी यावेळी सांगितले.
शहरी भागात कर्करोग वाढतोय: डॉ. राजेंद्र बडवे
कर्करोगाचे प्रमाण देशात सातत्याने वाढत असून ग्रामीण भागांपेक्षा शहरात कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे, तसेच भारतापेक्षा पाश्चात्य देशात ते प्रमाण अतिशय जास्त आहे, असे प्रतिपादन टाटा हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बडवे यांनी केले. महिलांमध्ये कर्करोगातून बरे होण्याचा दर पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे, असे डॉ. बडवे यांनी सांगितले.
येत्या काही वर्षात देशातील कर्करोग रुग्णांची संख्या २० लाख झाली असेल. कॅन्सरवर उपचार महाग असल्यामुळे देशात कॅन्सर होण्यापूर्वीच आळा घालण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे डॉ. श्रीपाद बाणावली यांनी सांगितले. कर्करोगावरील उपचाराचा खर्च कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून राज्य व केंद्र सरकार देखील या कार्यात सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला पीएमके फाउंडेशनच्या अध्यक्षा नयना कनल, आयोजन सचिव डॉ. संदीप बिपटे तसेच समाज सेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
०००