
मुंबई, दि. ८ : आपत्तीच्या काळात नागरिकांचे संरक्षण आणि तातडीने सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी बहुउद्देशीय निवारा केंद्रे गावानजीक अथवा शाळांच्या परिसरात उभारावीत. निवारा केंद्रे केवळ आपत्तीच्या काळापुरती मर्यादित न राहता स्थानिकांच्या नियमित उपयोगात येतील, यादृष्टीने त्यांची रचना करावी. तसेच उच्चदाब व लघुदाब वीजवाहिन्या भूमिगत करण्याच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
कोकण आपत्ती सौम्यीकरण उपाययोजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती दिली. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, निवारा केंद्रासाठी जागा निश्चित करताना नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तेथे सहज आणि तातडीने पोहोचता येईल, याचा प्राधान्याने विचार करावा. भूसंपादन आणि अन्य प्रशासकीय प्रक्रिया संबंधित विभागांनी समन्वयाने पूर्ण कराव्यात.
याचबरोबर, रायगड जिल्ह्यात उच्चदाब व लघुदाब वीजवाहिन्या भूमिगत करण्याची कामे अलिबाग, पेण, मुरुड, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे १०३.५ किलोमीटर उच्चदाब वीजवाहिनी भूमिगत करण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे कालबद्ध पद्धतीने पुर्ण करावीत. त्यानुसार मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढवावी. एचएलएल, महावितरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदारांनी आवश्यक परवानग्या व करारांची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
दरम्यान, यावेळी शासकीय जागेवर प्रस्तावित ३४ बहुउद्देशीय निवारा केंद्रांपैकी २४ केंद्रांसाठी जागा ताब्यात देण्यात आल्या असून, या सर्व ठिकाणी बांधकाम सुरू आहे. उर्वरित १० ठिकाणी भूसंपादन, सीआरझेड परवानगी, जागा मोजणी, बाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. खासगी जागेवर प्रस्तावित २८ निवारा केंद्रांपैकी २४ केंद्रांची कामे सुरू करण्यात आली आहेत.
समुद्रधूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची प्रस्तावित १४ बंधाऱ्यांपैकी कोलाड, अलिबाग, सासवणे, थळ, वागदंडा, कोर्लई, बोर्ली आणि वेळास आगर येथील सात कामे प्रगतिपथावर आहेत. मान्सूननंतर ही कामे वेगाने पूर्ण करून फेब्रुवारी २०२७ अखेर पूर्ण करण्याचे नियोजीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
खारभूमी विभागामार्फत प्रस्तावित १४ खारबंधाऱ्यांच्या मजबुतीकरणासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी सात कामे पूर्ण झाली असून, उर्वरित सात कामे प्रगतिपथावर आहेत. मान्सूननंतर उर्वरित कामे नियोजित कालावधीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेही दिली.
0000
श्रद्धा मेश्राम/विसंअ

WhatsApp