कोयना जलाशयातील मौजे मुनावळे येथे उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या कामांना तात्काळ गती द्या

कोयना जलाशयातील मौजे मुनावळे येथे उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या कामांना तात्काळ गती द्या
- Advertisement -


कोयना जलाशयातील मौजे मुनावळे येथे उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या कामांना तात्काळ गती द्या

मुंबई, दि. १: सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मौजे मुनावळे येथे कोयना जलाशयावर महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाकांक्षी जलपर्यटन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन केंद्राच्या कामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला. या प्रकल्पातील सर्व प्रलंबित कामांना तात्काळ गती देऊन नियोजित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री यांनी दिले.

यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेला निधी, आतापर्यंत झालेला खर्च, उपलब्ध निधी, उर्वरित आर्थिक आवश्यकता तसेच विविध यंत्रणांकडून आवश्यक असलेल्या मंजुरींचा सखोल आढावा घेण्यात आला. प्रकल्पात कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रशासकीय निर्णय तातडीने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीत जलपर्यटनासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक सुविधा उभारण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. मरिना, जेट स्की पार्किंग जेट्टी, अॅल्युमिनियम रॅम्प, लेक क्रूझिंग बोट, अल्ट्रा लक्झरी हाऊसबोट, सोलर इलेक्ट्रिक क्रूझिंग बोट्स, मल्टीहुल एफआरपी पॅसेंजर बोट, सी ब्रीचर, जेट बोट, फ्लाईंग बोट, कॅटामरान सेलिंग बोट, पॅरासेलिंग बोट, जेट स्की, जेटोव्हेटर तसेच इतर जलक्रीडा उपकरणांच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. ज्या उपकरणांचा पुरवठा झाला आहे ती तातडीने कार्यान्वित करण्याचे, तर निविदा प्रक्रियेत असलेली कामे निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी, महावितरणकडून वीजपुरवठा, वन विभागाची ना हरकत, जलसंपदा विभागाशी संबंधित बाबी, सुरक्षा व्यवस्थेसाठी आवश्यक यंत्रणा, बोट क्लब संचालनासाठी आवश्यक सुविधा तसेच धरण परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा ही बैठकीत घेण्यात आला. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून प्रकल्पातील अडचणी तातडीने दूर कराव्यात, असे निर्देश दिले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले म्हणाले की, कोयना जलाशय परिसराला नैसर्गिक सौंदर्याची अनमोल देणगी लाभली आहे. या परिसरात जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतील. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळेल. त्यामुळे प्रकल्पाच्या कामात कोणताही विलंब सहन केला जाणार नाही.

हा प्रकल्प महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. अत्याधुनिक जलक्रीडा सुविधा, पर्यावरणपूरक पर्यटन आणि जागतिक दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असून, सर्व आवश्यक मंजुरी आणि प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीस पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सदस्य सचिव विजय पोवार, पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, वन विभाग, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण तसेच इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ

 

 



Source link

- Advertisement -