मुंबई, दि. ३: महाराष्ट्र ही भारतामध्ये वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. देशात येणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ४० टक्के परकीय गुंतवणुक ही महाराष्ट्रात येते. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, क्वांटम कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, खाण संशोधन या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी असून महाराष्ट्र क्युबेकसोबत या क्षेत्रासाठी भागीदारी करण्यास तयार आहे. या भागीदारीतून राज्यात निश्चितच मोठी गुंतवणूक येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
कॅनडातील क्युबेक प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार मंत्री क्रिस्टोफर स्किट यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळासमवेत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २०१८ मध्ये मॉन्ट्रियल येथे भेट दिली असता, त्यावेळी माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीनीकरणीय ऊर्जा, जैवतंत्रज्ञान तसेच आदिवासी कल्याण या विषयावर सामंजस्य करार करण्यात आले होते. हे करार महाराष्ट्र आणि क्यूबेकमधील संबंध अधिक दृढ असल्याचे प्रतीक आहे. तसेच नुकतेच कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नेतृत्वात आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाशी मुंबई भेटीदरम्यान महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी विषयी सकारात्मक चर्चा झाली होती.
नवी मुंबईमध्ये एज्युसिटी उभारण्यात येत असून या ठिकाणी सर्व आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे.या एज्युसिटीमध्ये क्यूबेकमधील विद्यापीठांनी आपली दालने उघडून ‘मायनिंग इंजीनियरिंग’ या विषयाशी संबंधित अभ्यासक्रम विशेषत्वाने सुरू करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यामध्ये पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसह वाढवण बंदर प्रकल्पावर काम सुरू आहे. राज्यामध्ये गुंतवणूक करून उद्योग उभारण्यासाठी सुलभ धोरण आहे. राज्यातील गुंतवणूक ही दीर्घकालीन अनुकूल परिणाम देणारी आहे. ‘क्रिटिकल आणि स्ट्रॅटेजिक मिनरल्स’ मध्ये गुंतवणुकीची क्यूबेकमधील गुंतवणूकदारांना मोठी संधी आहे.
एरोस्पेस, डिफेन्स या क्षेत्रातही राज्यामध्ये मोठे काम होत आहे. नागपूर परिसरात ‘डिफेन्स कॉरिडोर’ ची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे एरोस्पेस क्षेत्राची परिसंस्था वेगाने विस्तारित होत आहे. त्याचप्रमाणे जीसीसी, डेटा सेंटर, बॅटरी स्टोरेज, कृषी मधील नवीन तंत्रज्ञान या क्षेत्रातही महाराष्ट्र पुढे येत आहे. त्यामुळे क्यूबेकने महाराष्ट्रसोबत दीर्घकालीन भागीदारी करावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.
क्युबेक प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार मंत्री क्रिस्टोफर स्किट म्हणाले की, क्यूबेक कॅनडामध्ये प्रगत राज्य असून कृत्रिम बुद्धिमत्ता, डाटा सेंटर, शिक्षण, क्रिटिकल मिनरल्स यामध्ये मोठी गुंतवणूक आहे. क्युबेक महाराष्ट्रासोबत विविध क्षेत्रांमध्ये भागीदारी करण्यास तयार आहे. पेन्शन फंड संस्थेच्या माध्यमातून भारतामध्ये मोठी गुंतवणूक करण्यास क्युबेकने तयारी केली आहे. भागीदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यात रस असल्याचेही स्किट यांनी सांगितले.
यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबळगन, राजशिष्टाचार विभागाचे सचिव राजेश गवांदे, कॅनडातील क्यूबेक प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार सहाय्यक उपमंत्री डॉमिनिक मार्कोट्टे, सल्लागार श्रीमती लिया फर्टीन, संचालक मायकल कॉन्स्टेनिन, स्टीफन फलेक्कर, क्यूबेक प्रांतातील सीडीपीक्यू गुंतवणूक संस्थेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक नटराजन वेंकटरमण आदी उपस्थित होते.
0000
निलेश तायडे/विसंअ






















WhatsApp