
नाशिक, दि. १९ (जिमाका) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्यातर्फे विविध शासकीय योजना, उपक्रम आणि लोककल्याणकारी कार्यक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकसंवाद’ अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या उपक्रमाला हरित कुंभ समन्वय समितीचे अमूल्य सहकार्य लाभत असून, त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी दुपारी चोपडा लॉन्स येथे गणेशमूर्ती दान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी आयोजित या उपक्रमातून नदी प्रदूषण रोखण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. स्वच्छ, सुरक्षित, निर्मल आणि बारमाही गोदावरी नदी वाहती ठेवण्यासाठी नदीपात्रात गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणारे प्रदूषण टाळणे महत्त्वाचे आहे. गणेशभक्तांनी श्रद्धेसोबतच पर्यावरणाची जबाबदारी जपत गणेशमूर्ती दान उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

गोदावरी नदी ही नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीचे संवर्धन आणि नदी परिसर स्वच्छ ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील भक्तीभावाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत नागरिकांनी गणेशमूर्ती दान करून नदी प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी पोलिस आयुक्तालयातील निरीक्षक युवराज पत्की, हरित कुंभ समन्वय समितीचे निशिकांत पगारे यांनी प्रदूषण टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याविषयावर मार्गदर्शन केले. प्रा. सोमनाथ मुठाळ, योगेश बर्वे, यशवंत नाशिककर, गीता बागुल, कांचन देसले आणि मंगेश बिरारी यांनी उपक्रमात सहभाग घेतला.
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे लिपिक परेश पाटील यांनी ‘लोकसंवाद’ अभियानाची उद्दिष्टे, विविध शासकीय योजनांची जनजागृती आणि अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. गणेशोत्सवाचा आनंद आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी यांचा समन्वय साधत नागरिकांनी गणेशमूर्ती दान उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
०००

WhatsApp