
धुळे, दि. २०सप्टेंबर, २०२६: सार्वजनिक गणेशोत्सवाला लोकमान्य टिळकांनी जनजागृती आणि समाजप्रबोधनाच्या चळवळीचे स्वरूप दिले. हीच परंपरा पुढे नेत धुळे शहरातील गणेश मंडळांनी श्रद्धा आणि उत्सवाबरोबरच सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्याचे कार्य अधिक व्यापक करावे. गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणणारा आणि सकारात्मक विचारांची ऊर्जा देणारा लोकोत्सव आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी, दि. १९ सप्टेंबर रोजी धुळे शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कलाकार आणि गणेशभक्तांशी संवाद साधत त्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. विविध मंडळांनी उभारलेले सजीव देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजप्रबोधनपर उपक्रमांची पाहणी करून त्यांनी कलाकार व कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
यावेळी महापौर मायादेवी परदेशी, आमदार अनुप अग्रवाल, माजी संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी महापौर जयश्री अहिरराव, चंद्रकांत सोनार व प्रदीप करपे, मुंबई बाजार समितीचे संचालक रावसाहेब गिरासे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
विविध मंडळांच्या भेटीदरम्यान पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केवळ धार्मिक उत्सव म्हणून नव्हे, तर लोकजागृती आणि समाजाला संघटित करण्याचे प्रभावी माध्यम म्हणून केली. हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून धुळ्यातील अनेक गणेश मंडळे वर्षानुवर्षे सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर उपक्रम राबवत आहेत. संवेदनशील सामाजिक विषयांवर सजीव देखावे सादर करून समाजाला विचार करण्यास प्रवृत्त करण्याचे काम मंडळांकडून होत आहे. ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.
एका मंडळाने सादर केलेल्या सजीव देखाव्यातील बालकलाकारांचे कौतुक करताना पालकमंत्री श्री.रावल म्हणाले की, मंदिरात गेल्यानंतर मूर्तीमध्ये जणू प्राण आल्याची अनुभूती होते, तशीच अनुभूती या बालकलाकारांचे सादरीकरण पाहताना आली. लहान मुलांनी अत्यंत प्रभावीपणे साकारलेल्या भूमिका, त्यांचा अभिनय आणि त्यामागे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. हिंदू एकता मित्रमंडळ गेल्या ४७ वर्षांपासून विविध संवेदनशील सामाजिक विषयांवर सजीव देखाव्यांच्या माध्यमातून जनजागृतीची परंपरा जपणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कलाकारांचे त्यांनी अभिनंदन केले.
जय श्री कृष्ण मित्र मंडळाच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी मंडळाचे भिकन वराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून धुळ्याची ओळख खानदेशासह महाराष्ट्रभर पोहोचली आहे. यंदा काही तांत्रिक कारणांमुळे अपेक्षित स्वरूपात आयोजन करता आले नसले, तरी पुढील वर्षी अधिक व्यापक आणि उत्साहपूर्ण पद्धतीने आयोजन व्हावे, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असेही पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.
धुळेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘श्रीमंत लालबागचा राजा’ गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर पालकमंत्री रावल म्हणाले की, गणरायावर भाविकांची अपार श्रद्धा आहे. मनोभावे केलेली प्रार्थना गणराया पूर्ण करतो, अशी भाविकांची दृढ धारणा असल्याने मोठ्या संख्येने नागरिक येथे दर्शनासाठी येतात. परिसरातील नागरिक आणि मंडळाचे कार्यकर्ते अत्यंत उत्साहाने, श्रद्धेने आणि आत्मीयतेने या उत्सवात सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या हिंदू आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये विघ्नहर्त्या गणरायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या स्मरणाने केली जाते. प्रत्येकाला मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेणे शक्य नसले, तरी त्याच श्रद्धेने आणि भक्तिभावाने धुळेकर येथील गणरायाच्या चरणी नतमस्तक होतात. सार्वजनिक गणेशोत्सवामुळे श्रद्धेबरोबरच सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि लोकसहभागाची भावना अधिक दृढ होते, असे पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.
‘बाप्पा डॉट ओआरजी’ वर सहभाग नोंदवा
गणेशोत्सवातील धुळ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, सामाजिक देखावे, आरत्या, सजावट, स्थानिक कलाकारांचे योगदान आणि पिढ्यान्पिढ्या जपलेल्या आठवणी यांचे डिजिटल स्वरूपात जतन होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी ‘बाप्पा डॉट ओआरजी’ या डिजिटल लोकचळवळीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाशी संबंधित छायाचित्रे, व्हिडिओ, कला, संस्कृती, परंपरा आणि आठवणींचे डिजिटल दस्तऐवजीकरण झाल्यास धुळे जिल्ह्याचा समृद्ध गणेशोत्सव वारसा राज्यासह जगासमोर पोहोचेल, असे त्यांनी सांगितले.
लोकसंवाद 2026’ मध्ये सक्रीय व्हा
गणेशोत्सवातील मोठ्या लोकसहभागाचा उपयोग शासनाच्या लोककल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठीही व्हायला हवा. माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘गणेशोत्सवातून लोकसंवाद २०२६’ उपक्रमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती गणेश मंडळांच्या माध्यमातून थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात ‘लोकसंवाद’ चित्ररथाच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने शासकीय योजनांची माहिती दिली जात असून, गणेश मंडळांनी या अभियानाला सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. रावल यांनी केले.
“गणेशोत्सव हा श्रद्धा आणि भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, लोकसहभाग आणि लोककल्याणाचा प्रभावी मंच ठरला पाहिजे. आपल्या गणेशोत्सवातील समृद्ध परंपरांचे ‘बाप्पा डॉट ओआरजी’च्या माध्यमातून डिजिटल जतन करूया आणि ‘लोकसंवाद २०२६’च्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवूया,” असे पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.
समाजातील वाईट आणि चुकीच्या प्रवृत्तींचा नायनाट होऊन चांगल्या विचारांचा विजय व्हावा, धुळे शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना गणरायाचे पाठबळ मिळावे आणि समाजहिताची कामे करण्यासाठी सर्वांना सामर्थ्य लाभावे, अशी प्रार्थना पालकमंत्री श्री.रावल यांनी श्री गणरायाच्या चरणी केली. भाविकांच्या मनातील चांगल्या आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, अशा सदिच्छा व्यक्त करून त्यांनी धुळेकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
या गणेश मंडळांच्या भेटीदरम्यान हिंदू एकता मित्र मंडळाचे हिरामण गवळी, जय श्री कृष्ण मित्र मंडळ, गल्ली नं. ७ चे भिकन वराडे; मरिमाता मित्र मंडळ, गल्ली नं. ४ चे चेतन गवळी; क्रांतीवीर राजगुरू मित्र मंडळाचे विक्की परदेशी; गणराज प्रतिष्ठान मित्र मंडळाचे राहुल अग्रवाल व ललित आहुजा; जय झुलेलाल मित्र मंडळाचे धिरज परदेशी; जय श्री कृष्ण मित्र मंडळ, सिंचन भवनचे प्रदीप बैरागी; वंदे मातरम् ग्रुपचे शामकांत बोरसे आणि प्रिंस ग्रुपचे नगरसेवक कृपेश नांद्रे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक कलाकार, गणेशभक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या गणेश मंडळांना दिल्या भेटी
पालकमंत्री श्री. रावल यांनी हिंदू एकता मित्र मंडळ, राजवाडे बँक समोर लालबाग मित्र मंडळ, गल्ली नं. ७ जय श्री कृष्ण मित्र मंडळ, गल्ली नं. ४ मरिमाता मित्र मंडळ, क्रांतीवीर राजगुरू मित्र मंडळ, गणराज प्रतिष्ठान मित्र मंडळ, जय झुलेलाल मित्र मंडळ, जय श्री कृष्ण मित्र मंडळ, वंदे मातरम ग्रुप आणि प्रिन्स ग्रुप या गणेश मंडळांना भेटी दिल्या.
००००

WhatsApp