
अकोला, दि. ३ : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे हेच शासनाचे प्राधान्य असून, त्यांना भरीव मदतीबरोबरच ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, पशुधनासाठी वैरण व्यवस्था, पेयजल व्यवस्था, जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणावर राबविण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.
महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळजन्य परिस्थितीबाबत उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून, दुष्काळग्रस्त भागाचा प्रत्यक्ष दौरा करून पाहणी करण्यात येत आहे. महसूल मंत्र्यांनी अकोला तालुक्यातील येवता व बाळापूर तालुक्यातील मानकी येथील दुष्काळग्रस्त परिसराची पाहणी केली, तसेच शासकीय विश्रामगृह येथे शेतकरी व नागरिकांकडून निवेदनेही स्वीकारली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व त्यांना दिलासा दिला. राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, महापौर शारदा खेडकर आदी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, केंद्र शासनाची अधिकाधिक मदत मिळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निकषांचा विचार करून अचूक पंचनामे होणे गरजेचे असते. त्यामुळे पंचनामे जलदपणे व अचूक पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा-पाणी, पीक पंचनामे आणि शेतीसाठी पाणीपुरवठा यांना प्राधान्य देत प्रशासकीय यंत्रणेने युद्धपातळीवर व समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

केंद्र शासनाच्या मदतीबरोबरच राज्य शासनाकडून भरीव मदत तसेच पीक विमा योजना व इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच रोजगारनिर्मिती व जलसंधारणाची अधिकाधिक कामे राबविण्यात येतील. पेयजल उपलब्धतेच्या दृष्टीने पाण्याचे योग्य नियोजन करण्यात येईल. ‘गावातले पाणी गावात, शिवारातले पाणी शिवारात’ अशा पद्धतीने पाण्याचा थेंब न् थेंब वाचविण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणावर राबविण्यात येतील. दुष्काळामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन व संपूर्ण यंत्रणा भक्कमपणे उभी आहे. जिल्हा नियोजन निधीचा दुष्काळ निवारणासाठी प्रभावी वापर करण्यात येईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. बँकांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून संपूर्ण सहकार्य करावे. त्यांना कुठलाही त्रास होता कामा नये. दुष्काळी परिस्थितीत बँकांनी कोणत्याही शेतकऱ्याकडे कर्जवसुलीसाठी सक्तीचा तगादा लावू नये. अवैध सावकारांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक किंवा फसवणूक होत असल्यास नागरिकांनी न घाबरता यंत्रणेकडे थेट अर्ज करावा, असे त्यांनी सांगितले.
शेतकरी बांधवांच्या पाठीशी संपूर्ण यंत्रणा
शेतकरी बांधवांनी या संकटात हिंमत सोडू नये. संपूर्ण यंत्रणा त्यांच्या पाठीशी आहे. शेतकरी बांधवांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांशी संवाद व शिदोरी भोजन
येवता येथील शेतकरी शेख रशीद शेख इस्माईल, तसेच बाळापूर तालुक्यातील हरिश्चंद्र शिरसाठ यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. शेख रजू शेख रशीद यांनी शेतात विहीर असतानाही पाण्याची कमतरता व भूजल पातळीतील घट याबाबत माहिती दिली. महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी देगाव शेतकरी बंधाऱ्यावर संजय अवचार यांच्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत शिदोरी भोजन घेतले. यावेळी अनेक पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००

WhatsApp