घोषित रुग्णालयांव्यतिरिक्त इतर रुग्णालयांनी दाखल करु नयेत कोव्हीड 19 संबंधित रुग्ण महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांचे आदेश

- Advertisement -

 कोव्हीड – 19 च्या प्रतिबंधासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्रिस्तरीय आरोग्य सुविधांचे नियोजन केले असून यामध्ये महानगरपालिकेची सर्व 23 नागरी आरोग्य केंद्रे व 4 रुग्णालये याठिकाणी  “फ्ल्यू क्लिनिक” स्थापन करण्यात आले आहेत.

      या “फ्ल्यू क्लिनिक” मधून कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या संदर्भित केलेल्या नागरिकांची कोरोना विषयक तपासणी करण्यात येणार असून त्यांच्यावर (1) बहुउद्देशीय इमारत, सेक्टर 14, वाशी (134 बेड्स क्षमता), (2) इंडिया बुल्स, कोनसावळे, पनवेल (500 बेड्स क्षमता),(3) एम.जी.एम.सुपर स्पेशालिटी हॉस्पि.,से.30,वाशी.(200 बेड्स क्षमता) या तीन “कोव्हीड केअर सेंटर(CCC)” मध्ये उपचार करण्यात येणार आहेत. त्यामधून – (अ) सॅम्पल टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या सौम्य स्वरुपाची लक्षणे असलेल्या कोव्हिड – 19 रुग्ण यांच्यावर याठिकाणी स्थापित स्वतंत्र कक्षात उपचार करण्यात येतील. तसेच  (ब) सॅम्पल टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या नागरिकांना येथील स्वतंत्र इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात येईल. 

      त्याचप्रमाणे मध्यम स्वरुपाची लक्षणे आढळणाऱ्या कोव्हिड -19 बाधीत रुग्णांवर (1) हिरानंदानी फोर्टीज हॉस्पिटल, सेक्टर 10, वाशी (40 बेड्स क्षमता), (2) डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालय ( ई विंग), सेक्टर 5, नेरूळ. (100 बेड्स क्षमता), (3) रिलायन्स हॉस्पिटल, ठाणे बेलापूर मार्ग, कोपरखैरणे. (20 बेड्स क्षमता) या तीन “डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (DCHC)” मध्ये उपचार केले जाणार आहेत.

      याशिवाय गंभीर स्वरुपातील लक्षणे असलेल्या कोव्हिड – 19 बाधीत रुग्णांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात स्थापीत “डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल” (DCH) मध्ये (120 बेड्स क्षमता) उपचार केले जाणार आहेत.

      कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने उपचाराकरीता सदर त्रिस्तरीय रुग्णालय सुविधांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व ठिकाणी नियोजन व नियंत्रणासाठी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रत्येक रुग्णालयात जबाबदार वैद्यकिय अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे.

      त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीड – 19 च्या उपचाराकरीता घोषित केलेली रुग्णालये वगळता इतर कोणत्याही रुग्णालयांनी कोव्हीड – 19 संबंधित रुग्ण उपचारार्थ दाखल करु नयेत, असे आदेश साथरोग अधिनियम, 1897 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजना करण्याकरीता शासनाने ‘सक्षम अधिकारी’ म्हणून नियुक्त केलेल्या महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी जारी केले आहेत.

      यामध्ये डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर ( DCHC) म्हणून घोषित केलेल्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, सेक्टर 5, नेरुळ मधील ई विंग पूर्णत: कोव्हीड – 19 ची मध्यम लक्षणे आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांसाठी कार्यरत राहणार असून याठिकाणी संशयित रुग्ण व बाधित रुग्ण यासाठी स्वतंत्र क्षेत्र असणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ही दोन्ही क्षेत्रे एकत्र होणार नाहीत याची काळजी घेण्याबाबत रुग्णालय व्यवस्थापनास तसेच त्याठिकाणी नियुक्त नोडल अधिकारी यांना निर्देशित करण्यात आले आहे. अशाच प्रकारे डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर ( DCHC) म्हणून घोषित करण्यात आलेल्या हिरानंदानी फोर्टीज रुग्णालय सेक्टर 10 वाशी (40 बेड क्षमता) आणि रिलायन्स हॉस्पिटल कोपरखैरणे ( 20 बेड क्षमता) यांनी कार्यवाही करावयाची आहे. या सर्व रुग्णालयांसाठी स्वॅब सॅम्पल संकलन आणि कोव्हीड रुग्णांची ने-आण करण्यासाठी सुसज्ज रुग्ण वाहिका तयार ठेवण्यात आलेल्या आहेत.

      नवी मुंबई महानगरपालिका त्रिस्तरीय रुग्णालय सेवा नियोजनातून कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण ताकदीने लढा देत असून सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आपले सक्रीय योगदान द्यावे असे आवाहन महापौर श्री. जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.  

- Advertisement -