मुंबई, दि. १७ : दादर रेल्वे स्थानकावर चाइल्ड हेल्पलाइन, मुंबई शहर आणि रेल्वे चिल्ड्रेन इंडिया यांच्या पथकाने रेल्वे पोलीस (जीआरपी) यांच्या समन्वयाने तातडीने कार्यवाही करत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करून तिला बाल संरक्षण यंत्रणेच्या स्वाधीन केले, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी दिली आहे. मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने तिला बालगृहात दाखल करण्यात आले आहे.
पत्रकात दिलेल्या माहितीनुसार दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना मानवी तस्करीविरोधी पथकाकडून संबंधित मुलीबाबत माहिती प्राप्त झाली होती. त्याचप्रमाणे, रेल्वे सुरक्षा दलाला देखील रेल मदद पोर्टलच्या माध्यमातून यासंदर्भात संदेश प्राप्त झाला होता. मुलीची सुरक्षितता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी ही माहिती चाइल्ड हेल्प लाईन आणि रेल्वे चिल्ड्रेन इंडिया यांच्या पथकासोबत सामायिक केली.
माहिती मिळताच चाइल्ड हेल्पलाइन आणि रेल्वे चिल्ड्रेन इंडिया यांच्या पथकाने तातडीने ऑनलाइन समन्वय बैठक घेऊन पुढील कार्यवाहीचे नियोजन केले. त्यानंतर दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १३/१४ येथे प्रत्यक्ष भेट देऊन (आउटरीच) मुलीची ओळख पटविण्यात आली. चाइल्ड हेल्पलाइन आणि जीआरपी यांच्या संयुक्त सहकार्याने मुलीला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक संवादादरम्यान मुलीने ती छत्तीसगड राज्यातील दुर्ग जिल्ह्याची रहिवासी असून इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत असल्याचे सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या एका परिचित व्यक्तीला भेटण्यासाठी ती मुंबई येथे आली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने तिचे वय, सुरक्षितता आणि संरक्षणाची गरज लक्षात घेऊन आवश्यक बाल संरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली.
जीआरपी पोलीस ठाण्यात आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मुलीची जेजे रुग्णालयात प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिची सुरक्षितता, निवास, देखभाल आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी बाल कल्याण समितीच्या प्रक्रियेनुसार तिला सुखरूप बालगृहात दाखल करण्यात आले.
या कार्यवाहीच्या अनुषंगाने दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी संबंधित पथकासोबत बैठक घेऊन मुलीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चाइल्ड हेल्पलाइन आणि रेल्वे चिल्ड्रेन इंडिया यांच्या पथकाने दाखविलेली तत्परता, सक्रियता, समन्वय आणि बाल संरक्षणाप्रती असलेली बांधिलकी यांचे विशेष कौतुक केले. रेल्वे स्थानकावर पथक सातत्याने कार्यरत असल्यामुळे आणि बालकांच्या संरक्षणासाठी संवेदनशीलतेने काम करत असल्यामुळेच ही महत्त्वपूर्ण माहिती पथकासोबत सामायिक करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भविष्यातही याच तत्परतेने आणि समर्पित भावनेने कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी पथकातील सदस्यांना केले.
ही संपूर्ण कार्यवाही चाइल्ड हेल्पलाइन, मुंबई शहर, रेल्वे चिल्ड्रेन इंडिया, राजकीय रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि मानवी तस्करीविरोधी पथक यांच्यातील प्रभावी समन्वय, तत्पर प्रतिसाद आणि सामूहिक प्रयत्नांचे महत्त्वपूर्ण उदाहरण ठरली आहे.
0000
श्रद्धा मेश्राम/विसंअ

WhatsApp