दिवाळीत एसटीला प्रवाशांची विक्रमी पसंती – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    - Advertisement -

    • दिवाळीच्या परतीच्या प्रवासात एकाच दिवसात 46.53 कोटींची विक्रमी कमाई!

    मुंबई, दि. १७ : दिवाळीचा आनंद, सलग सुट्ट्यांची पर्वणी आणि गावी जाण्यासह परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) लालपरीला भरभरून पसंती दिली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या 16 दिवसांत एसटीने तब्बल 548 कोटी 22 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले असून, दररोज सरासरी 34 कोटी 25 लाख रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, दिवाळी सणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी परतीच्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे एसटीने एकाच दिवसात 46 कोटी 53 लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवण्याचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. एसटीच्या या विक्रमी कामगिरीबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी राज्यातील प्रवाशांचे आभार मानले आहेत.

    ऑक्टोबर महिन्यात महिला सन्मान योजनेच्या अंमलबजावणीतील सक्तीमुळे तसेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला होता. मात्र, नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सण, सलग सुट्ट्या, प्रवाशांची वाढलेली संख्या आणि महिला सन्मान योजनेच्या अंमलबजावणीत देण्यात आलेली शिथिलता यामुळे एसटीच्या उत्पन्नाला मोठी चालना मिळाली आहे.

    यंदाच्या दिवाळी हंगामातील आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे दरवर्षी गर्दीच्या हंगामात आकारली जाणारी हंगामी भाडेवाढ यंदा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे सणासुदीच्या काळातही प्रवाशांना नेहमीच्याच तिकीट दरात प्रवास करता आला. खासगी वाहतुकीच्या तुलनेत सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय म्हणून एसटीने पुन्हा एकदा आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.

    प्रवाशांचा विश्वास आणि एसटी कर्मचाऱ्यांचे परिश्रम यांच्या बळावर लालपरीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. दिवाळीतील हा विक्रमी प्रतिसाद म्हणजे एसटीवरील जनतेच्या अढळ विश्वासाची पावतीच ठरली आहे. असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. त्याचबरोबर सणासुदीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या एसटी महामंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी, चालक आणि वाहक यांचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

    ००००

    - Advertisement -