
मुंबई, दि. १४ : किल्ले प्रतापगड येथील शिवप्रताप दिन शौर्य स्मारक आणि वीर जिवाजी महाले यांच्या पुतळा उभारणीच्या कामांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि महाराष्ट्राचा गौरवशाली ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात यावा, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
मेघदूत शासकीय निवासस्थानी झालेल्या आढावा बैठकीस पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव , पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, उपसचिव संतोष रोकडे, पुणे विभागीय संचालक भरत लांघी, कार्यकारी अभियंता आकाश चकोर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत शिवप्रताप दिन शौर्य स्मारक प्रकल्पांतर्गत प्रस्तावित बुरुजावरील मशाल, प्रकाशयोजना, ड्रोन शो, त्रिमितीय (थ्रीडी) चित्रफीत, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या(एआय) माध्यमातून सादरीकरण तसेच अन्य विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
शिवप्रताप दिनाच्या ऐतिहासिक प्रसंगाचे महत्त्व अधोरेखित करणारी दर्जेदार चित्रफीत थ्रीडी आणि ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करावी. तसेच स्मारकातील गॅलरीची आसनक्षमता वाढविण्यासह पर्यटकांना अधिक प्रभावी आणि माहितीपूर्ण अनुभव मिळेल, अशा सुविधा विकसित कराव्यात.
किल्ले प्रतापगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि स्वराज्याच्या इतिहासाचा महत्वपूर्ण साक्षीदार आहे. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व जपत स्मारक परिसराचा विकास दर्जेदार पद्धतीने करण्यात यावा. ऐतिहासिक वारशाचे जतन, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा समन्वय साधून सर्व कामे नियोजनबद्धरित्या पूर्ण करावीत, असे निर्देशही पर्यटन मंत्री देसाई यांनी दिले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा पराक्रम, वीर जिवाजी महाले यांचे शौर्य आणि स्वराज्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांची माहिती पर्यटकांना अनुभवात्मक पद्धतीने मिळणार आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून प्रकल्पाच्या दर्जावर विशेष लक्ष द्यावे, असेही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
0000
संध्या गरवारे/विसंअ

WhatsApp