रायगड, अलिबाग, दि.२: महिलांना उद्योजक बनवण्यासाठी राज्यात विविध योजना राबवल्या जात असून, राज्यातील प्रत्येक महिला लखपती आणि आत्मनिर्भर झाली पाहिजे, हे उद्दिष्ट प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य महिला व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून सातत्याने होत असल्याचे प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, ऊर्जा, महिला व बालविकास आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पनवेल येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने पनवेल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या प्रसंगी त्या बोलत होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त निमित्त शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या शिबिराला सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या महसूल विषयक विविध तक्रारी व शासकीय कामांचा निपटारा एकाच छताखाली जलद गतीने करण्यात आला. याप्रसंगी जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, सातबारा उतारा आणि इतर आवश्यक कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंत्री मेघना बोर्डीकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले.
आपल्या भाषणात मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले की, बळीराजाला केवळ बळीराजा म्हणण्याचे दिवस आता गेले असून तो खऱ्या अर्थाने अन्नदाता आहे. त्या अन्नदात्याला स्वावलंबी बनवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार देशात व राज्यात कार्यरत आहे. देशातील शेतकऱ्यांच्या मालाला दरवर्षी हमीभाव वाढवून देण्याचे काम सातत्याने केले जात आहे. तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या विविध संधी आपल्या परिसरात उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे नियोजन सुरू आहे.

राज्यभरात समाधान शिबिराच्या माध्यमातून १० लाख लोकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट असताना, एकट्या रायगड जिल्ह्यातूनच सव्वादोन लाखांपेक्षा अधिक नागरिकांना या शिबीरांचा लाभ मिळवून देण्यात आला असल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आमच्यासारखे कार्यकर्ते हे शासकीय योजना आणि त्यांचे लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका पुलाप्रमाणे काम करत आहेत. सरकारने योजना आणल्यानंतर ती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि नागरिकांच्या समस्या सरकारपर्यंत मांडणे, यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल होत आहे. हे काम केवळ एका दिवसापुरते मर्यादित नसून वर्षाचे ३६५ दिवस सातत्याने सुरू असते, असे सांगत सरकारच्या योजनांचा लाभ थेट ग्रामपंचायतींपर्यंत आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सर्व लोकप्रतिनिधी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, अविनाश कोळी, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसिलदार श्रीमती मिनल भामरे, पनवेल पंचायत समिती सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य कमला देशेकर, प्राची जाधव, सोनाली जितेकर, पंचायत समिती सदस्या जिज्ञासा कोळी, आरती काठे, वैशाली सावंत, वर्षा केवाळे, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती बबन मुकादम, नगरसेवक मनोज भुजबळ, रामदास शेवाळे, सुमित झुंझारराव, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सरपंच सीताराम चौधरी आणि आनंद ढवळे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनवेल मतदारसंघातील शेकडो नागरिकांनी या शिबीराचा प्रत्यक्ष लाभ घेत विविध दाखले व शासकीय कामे तत्परतेने पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.






















WhatsApp