– जत नगरपरिषदेच्या १२ कोटींच्या विविध कामांचे भूमिपुजन
सांगली, दि. १४ (जि. मा. का.) : जतची दुष्काळी भाग ही ओळख पुसण्यासाठी खास एजन्सी नेमून जतचा टप्प्याटप्याने विकास करण्यासाठी आराखडा तयार करावा. शासन निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.
जत नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व त्यानंतर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर, नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रविण धानोरकर, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, जतमधील नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील आणि वर्षानुवर्षे असलेली दुष्काळी भाग अशी जतची ओळख पुसून तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी खास एजन्सी नेमून ठोस विकास आराखडा तयार करावा. त्यामध्ये नागरिक, विद्यार्थिनींचीही मते विचारात घेतली जावीत. रस्ते, शिक्षण, वीजपुरवठा, पाणीपुरवठा अशा मूलभूत सोयी-सुविधापासून नागरिक वंचित राहणार नाहीत, यासाठी सर्वसमावेशक विकास आराखडा करावा. त्याचा प्राधान्यक्रम ठरवावा. शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, असे त्यांनी सांगितले.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, रोजगारासाठी जत तालुक्यातील नागरिकांचे होणारे स्थलांतर थांबवून जतची दुष्काळी भाग ही ओळख पुसण्यासाठी विविध योजनातून भरीव निधी आणला आहे. यामध्ये रस्ते कामासाठी सर्वाधिक ५०२ कोटींचा निधी, विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना, तालुक्यातील आठ मंदिरांना तीर्थक्षेत्र दर्जा, जत शहरासाठी पाणी योजना, बंदिस्त भुयारी गटारी योजना, नाट्यगृह आदी कामांचा त्यांनी उल्लेख केला. तसेच जिल्हा परिषद शाळा, जतचे बसस्थानक, तालुक्यातील ४० मंदिरांचा साखळी विकास, क्रीडा संकुल आदी कामांसाठी पाठपुरावा करत असल्याची त्यांनी सांगितले.
सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन केले, प्रास्ताविक डॉ. रवींद्र आरळी यांनी केले, प्रारंभी राज्यगीत व राष्ट्रगीत गायन करण्यात आले, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिपूजन झालेल्या विकास कामांचा तपशील पुढीलप्रमाणे,
नगरविकासच्या वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेअंतर्गत जत नगरपरिषद, जतच्या इमारत बांधकामाचे भूमिपुजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
जत नगरपरिषद इमारत बांधकाम
– या कामासाठी नगरविकास विभागाकडून नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत ५ कोटी व राज्याच्या नियोजन विभागाकडून नागरी सेवा सुविधा पुरविण्यासाठी ५ कोटी असा एकूण १० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत प्राप्त ५ कोटी रकमेची निविदा प्रक्रिया होऊन कार्यारंभ आदेश दिनांक १३ जुलै २०२६ रोजी वितरीत करण्यात आले आहेत.
नमो उद्यान विकसित करणे – या कामासाठी नगरविकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेअंतर्गत १ कोटी रूपये निधी प्राप्त झालेला आहे. निविदा प्रक्रिया होऊन दि. १७ जुलै २०२६ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत.
ग्रंथालय बांधकाम करणे – या कामासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजना सन २०२५-२६ मधून १ कोटी निधी प्राप्त झालेला आहे. निविदा प्रक्रिया होऊन दि. १७ जुलै २०२६ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. ग्रंथालयाची प्रशस्त दोन मजली सुसज्ज इमारत होणार असून, ८० विद्यार्थ्यांना बसण्याची सुविधा करण्यात येणार आहे.
00000









WhatsApp