वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासह पाणीपुरवठा योजनांचा पालकमंत्री यांनी घेतला आढावा

- Advertisement -


बुलढाणा, दि. १४ (जिमाका) : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासह जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा व सिंचन प्रकल्पांचा मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील नागरिक व शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध आढावा बैठकीत आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. बुलढाणा व मोताळा तालुक्यातील विविध पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा, भविष्यातील पाण्याची गरज तसेच योजनांच्या अंमलबजावणीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेसे व नियमित पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी संबंधित योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. पाटील यांनी दिले.

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पातून बुलढाणा मतदारसंघातील वंचित राहणाऱ्या भागांना सिंचन, पिण्यासाठी तसेच औद्योगिक वापरासाठी वाढीव पाणी उपलब्ध करून देण्याच्या शक्यता तपासाव्यात, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. यासाठी आवश्यक उपाययोजना व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव जलाशयाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता जलाशयाची क्षमता वाढविण्याची शक्यता तपासून आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही करण्याच्या सूचना ना. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

खडकपूर्णा प्रकल्पात अंचरवाडी लघुपाटबंधारे तलाव क्रमांक १ आणि मिसळवाडी लघु तलावाचा समावेश करण्याबाबतही पालकमंत्र्यांनी माहिती घेतली. या समावेशामुळे संबंधित भागातील सिंचन तसेच पाणी उपलब्धतेला चालना मिळण्याची शक्यता असून, याबाबतची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील पाणीपुरवठा व सिंचनाशी संबंधित प्रकल्पांना गती देऊन त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिक आणि शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करावी, असेही पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले.

000000



Source link

- Advertisement -