
• महिला सक्षमीकरण, बालसंरक्षण, पोषण आणि दुष्काळग्रस्त भागांतील महिला व बालकांच्या कल्याणावर होणार संवाद
मुंबई, दि. २९: दुष्काळ व टंचाईग्रस्त भागांतील महिला आणि बालकांच्या पोषण व आरोग्यविषयक गरजा, स्थलांतरित कुटुंबांतील महिला व बालकांना आवश्यक सेवा-सुविधांची आणि विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी या महत्त्वपूर्ण विषयांवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त वर्षा लड्डा यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, विभागाचे प्राधान्यक्रम आणि आगामी नियोजन याबाबत आयुक्त वर्षा लड्डा यांनी या मुलाखतीत संवाद साधला आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवार, ३० ऑक्टोबर, शनिवार, ३१ ऑक्टोबर तसेच सोमवार, २ नोव्हेंबर आणि मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम उपलब्ध होणार आहे. या मुलाखतीचे निवेदन पूनम चांदोरकर यांनी केले आहे.
महासंचालनालयाची अधिकृत समाजमाध्यमे:
ट्विटर (X): MahaDGIPR
फेसबुक: MahaDGIPR
यूट्यूब: MaharashtraDGIPR

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना, प्रस्तावित बालधोरण आणि एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रस्तावित धोरण यासह महिला व बालकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती या मुलाखतीतून मिळणार आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी, लाभार्थ्यांपर्यंत त्यांचे लाभ पोहोचविणे, तंत्रज्ञानाचा वापर, जनजागृती आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या प्रयत्नांवरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला आहे.
दुष्काळ व टंचाईग्रस्त भागांतील महिला, गर्भवती व स्तनदा माता तसेच बालकांच्या पोषण आणि आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांतील महिला व बालकांना अंगणवाडी सेवा, पोषण आहार, आरोग्य सुविधा आणि शिक्षण उपलब्ध करून देण्यासंदर्भातील नियोजन याविषयीही या मुलाखतीत चर्चा होणार आहे. बालविवाह, बालतस्करी, बालमजुरी आणि बालभिक्षेकरी यांसारख्या सामाजिक समस्यांना प्रतिबंध घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, महिला व बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि संबंधित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी याबाबतही आयुक्त वर्षा लड्डा माहिती देणार आहेत. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांचाही आढावा या मुलाखतीत घेण्यात आला आहे.
००००
जयश्री कोल्हे/स.सं.

WhatsApp