Home शहरे जळगाव जळगावकरांची चिंता वाढली; करोना सदृश्य आजाराची लक्षणे

जळगावकरांची चिंता वाढली; करोना सदृश्य आजाराची लक्षणे

0

जळगाव : जिल्ह्यात करोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. अमळनेर तालुक्यातील ६० वर्षीय महिलेला करोना सदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने तिला १७ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातील करोना संसर्ग कक्षात दाखल करण्यात आले आहे. तिचे नमुने चाचणीसाठी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. या चाचणीचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला आहे. तो सकारात्मक आल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.

दुसऱ्या बाजूला यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगिकरण कक्षात गेल्या काही दिवसांपासून भरती असलेल्या दोन जणांचे करोना चाचणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे यवतमाळातील करोनाबधितांची संख्या आता आठवर पोहोचली आहे. यवतमाळच्या दोन रुग्णांवर अनुक्रमे मुंबई आणि पुण्यात यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात शनिवारी ३२८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, करोनाबाधित रुग्णसंख्या ३६४८वर गेली आहे. गेल्या २४ तासात ११ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील पाच, पुण्यातील चार आणि ठाणे व औरंगाबाद महापालिका हद्दीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यात एकूण करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या २११ झाली आहे.