
नागपूर, दि. ०७: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शक्य आहे तिथे विंधन विहिरी घेण्यास परवानगी देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा या गावात शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी केली. शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी मुक्काम केला. शेतकऱ्यांसमोर असलेले संकट आणि या संकटावर कशी मात करता येईल या संदर्भात त्यांनी बालपांडे यांच्यासोबत संवाद साधला. चिंताग्रस्त शेतकऱ्यांना धीर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी गावात आलो आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतीमध्ये घेण्यात येत असलेल्या पिकांबद्दल व दुष्काळामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात चर्चा केली.

हवामान बदलामुळे काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली त्यानंतर पाऊसच पडला नाही आणि अद्यापही पाऊस नसल्यामुळे शेतातील पिकांची हानी झाली आहे. या दोन्ही प्रसंगांमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत दिली जात आहे. काटोल, नरखेड परिसरात संत्र्यासह मोसंबीचे मोठ्या प्रमाणात पीक होत आहे. परंतु, बांगलादेशने निर्बंध घातल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. या संदर्भात मिहान येथे मोठा प्रकल्प सुरू होत असून या पिकांवर प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहे .शेतकरी अडचणीत येणार नाही, त्याची खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

रब्बीचे पीक वाचवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, या संदर्भातही शेतकऱ्यांसोबत चर्चा केली शेतीच्या संरक्षणासाठी कुंपण घालण्याची योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आव्हानही मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केले.

शेतकऱ्यांच्या दुःखांमध्ये सहभाग घेऊन दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री आमच्या घरी आलेत सोबत मुक्काम केला तसेच आमच्या घरच्या चटणी भाकरीचा आस्वाद घेतला, याचा आम्हाला अभिमान वाटला, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जो धीर दिला त्यामुळे आम्हाला संकटावर मात करण्याची हिंमत मिळाली, अशी भावना रामभाऊ बालपांडे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांनी बालपांडे कुटुंबाची माहिती घेतली व शेतातील नुकसान झाल्यामुळे निश्चित मदत देण्याची ग्वाही दिली.

०००

WhatsApp