जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रत्येक कामगाराला शासकीय योजनांचा लाभ – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रत्येक कामगाराला शासकीय योजनांचा लाभ – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
- Advertisement -

नंदुरबार, दि.२१ (जिमाका वृत्त): बालकांपासून ते थेट वयोवृद्ध नागरिकांसाठी विविध शासकीय योजना आहेत, या योजनांमध्ये इमारत बांधकाम कामगारांसाठीच्याही योजनांचा समावेश असून जिल्ह्यातील अशा प्रत्येक कामागाराला शासकीय योजना देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

येथील कोरीट नाका परिसरातील बाफना कॉम्प्लेक्स येथे ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेत महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई तर्फे आयोजित नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी अत्यावश्यक व सुरक्षा संचाचे वाटप पालकमंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार डॉ. हिना गावित, कामगार अधिकारी अ. द. रूईकर, नोंदणी अधिकारी, विशाल जोगी, संजय कोकणी, केंद्र संचालक प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले की, सध्या राज्यभर ‘शासन आपल्या दारी’ मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार लाभार्थींना येत्या महिनाभरात लाभ दिला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील इमारत बांधकाम मजूरांना थेट लाभ देण्यासाठी कामगार कल्याण मंडळ थेट आपल्या नंदुरबार जिल्ह्यात आले आहे. इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम अन्वये कामगारांची मंडळांमध्ये नोंदणी करताना मागील वर्षभरात किमान ९० दिवस बांधकामावर काम करणे अनिवार्य आहे. तसेच अधिनियमाच्या कलम ११ नुसार मंडळाअंतर्गत नोंदीत बांधकाम कामगार मंडळाच्या योजनेच्या लाभास पात्र आहेत.

मंत्री डॉ. गावित पुढे म्हणाले की, राज्यातील  बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावशक संच वितरित करण्यासाठी ५ लाख ८३ हजार  ६६८  इतक्या संच वाटपास मान्यता देण्यात आली असून त्यातील एक हजार जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आज एक हजार संचाचे वितरण करत असताना मनस्वी आनंद होत आहे.

बांधकाम कामगारांसाठी केंद्र व राज्याच्या २६ योजना – खासदार डॉ. हिना गावित

महाराष्ट्र शासनाने १ मे, २०११ रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना केलेली आहे. राज्यातील इमारत व इतर बांधकाम आस्थापनाकडून जमिनीची किंमत वगळून बांधकाम खर्चाच्या १% दराने उपकर वसूल करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे जमा करण्यात येत आहे.

जमा झालेला उपकर निधी राज्यातील इमारत व बांधकाम कामगाराच्या कल्याणकारी योजनासाठी वापरण्यात येत असतो. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे कामगार विभागाच्या कार्यालयामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यात येते. कामगाराने नोंदणी केल्यानंतर जीवित असेपर्यंत संबंधित कामगार मंडळाच्या सर्व योजनांचे लाभ घेण्यासाठी तो पात्र ठरतो. सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारांसाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध अशा २६ कल्याणकारी योजना राबविण्यात येतात, या सर्व योजनांसाठी नोंदणी करून लाभ घेण्याचे आवाहन यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी केले.

०००

- Advertisement -