जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांची विशेष मुलाखत – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. जैन अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी, युवक, महिला आणि उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, या उद्देशाने महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती या मुलाखतीतून देण्यात येणार आहे.

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार ४ आणि गुरुवार ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे. या मुलाखतीचे निवेदन निवेदक प्रणय चव्हाण यांनी केले आहे.

    या मुलाखतीत महामंडळाची स्थापना, उद्दिष्टे आणि कार्याची व्याप्ती, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना, युवकांसाठी स्वयंरोजगार व उद्योग-व्यवसायाकरिता उपलब्ध आर्थिक सहाय्य, तसेच लघुउद्योजक आणि महिला उद्योजकांसाठी असलेल्या संधींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय दुष्काळसदृश परिस्थितीत रोजगाराच्या पर्यायी संधी निर्माण करणे, व्यवसायांना आर्थिक बळ देणे आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी महामंडळाची भूमिका याविषयीही गांधी माहिती देणार आहेत.

    अल्पसंख्याक समाजातील पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करावी आणि उपलब्ध संधींचा उपयोग करून प्रगती साधावी, असे आवाहन या मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून प्रसारित होणारी ही मुलाखत आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील विविध केंद्रांवरून ऐकता येणार आहे.

    000

    जयश्री कोल्हे/ससं

     

     

     

     

     

    - Advertisement -