
- सांस्कृतिक देवाणघेवाणीतून राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २ – भारताच्या भाषा, रूढी आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी भारतीयत्वाची ओळख सर्वांना एकत्र बांधते. देशाची विविधता ही सर्वांत मोठी ताकद असून नागरिकांनी देशातील विविध भागांना भेटी देऊन तेथील संस्कृती अनुभवावी आणि नागरिकांशी संवाद साधावा. अशा सांस्कृतिक देवाणघेवाणीतून राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट होईल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र लोकभवन येथे आयोजित आंध्रप्रदेश, छत्तीसगढ़, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू या आठ राज्यांसह अंदमान व निकोबार बेटे, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या पाच केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिन सोहळ्यात राज्यपाल बोलत होते. त्यांनी या राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशांतील नागरिकांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्यपाल वर्मा म्हणाले की, भारतातील राज्ये ही विविधरंगी सुंदर फुलांप्रमाणे असून त्यातून भारताचा भव्य पुष्पगुच्छ साकारला आहे. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने देशाचा सामायिक सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मतभेदांच्या पलीकडे जाऊन परस्परांकडून शिकणे, विविधतेचा आदर करणे आणि समृद्ध, एकसंध भारताच्या उभारणीचा संकल्प करणे आवश्यक आहे.
राज्यांच्या पुनर्रचनेच्या इतिहासाचा उल्लेख करून राज्यपालांनी सांगितले की, केंद्र शासनाने १९५३ मध्ये फजल अली आयोगाची नियुक्ती केली. आयोगाच्या शिफारशींनुसार १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्यासह १४ राज्ये आणि सहा केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. पुढे १९६० मध्ये मुंबई राज्याचे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये विभाजन झाले, तर १ नोव्हेंबर २००० रोजी छत्तीसगढ़ राज्याची निर्मिती झाली.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वामुळे देश एकसंध झाला. सरदार पटेल यांनी ‘एक भारत’ दिला असून त्याचे ‘श्रेष्ठ भारत’मध्ये रूपांतर करणे ही १४० कोटी भारतीयांची सामूहिक जबाबदारी असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विचार ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाला प्रेरणा देतो. विविधतेतील एकतेचा उत्सव साजरा करणे, भावनिक बंध दृढ करणे आणि देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.
भारताला शतकानुशतके समान सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाने जोडले आहे. आद्य शंकराचार्यांनी बद्रिकाश्रम, शृंगेरी, द्वारका आणि पुरी येथे आध्यात्मिक केंद्रे स्थापन करून विविध प्रदेशांतील सांस्कृतिक संबंध दृढ केले. संत नामदेवांनी महाराष्ट्रातून पंजाबपर्यंत भक्तीचा संदेश पोहोचविला, तर दहावे शीख गुरू गोविंदसिंह यांनी आपल्या आयुष्याची अखेरची वर्षे नांदेड येथे व्यतीत केली. स्वामी विवेकानंदांनीही भारतीयांना आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगण्याची प्रेरणा दिली, असे राज्यपालांनी सांगितले.
संघर्ष आणि हिंसाचाराचा सामना करणाऱ्या जगाला भगवान महावीर, भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या भूमीतून शांतता व प्रगतीचा मार्ग दाखविण्याची क्षमता आणि जबाबदारी भारताकडे आहे. त्यासाठी सर्वांनी भेदाभेदांच्या पलीकडे जाऊन एकजुटीने उभे राहावे, असेही राज्यपाल वर्मा यांनी सांगितले. सोहळ्यात गौरविण्यात आलेल्या मान्यवरांचे तसेच भारताची सांस्कृतिक विविधता सादरीकरणातून अधोरेखित करणाऱ्या विद्यार्थी, कलाकार, नृत्यदिग्दर्शक आणि सहभागी संस्थांचे राज्यपालांनी अभिनंदन केले.
यावेळी वर्मा फाउंडेशनचे संस्थापक पी. यू. एन. वर्मा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, उद्योगपती व अभियांत्रिकी तज्ज्ञ नवीन हेगडे, निखत खान हेगडे, यशपाल शर्मा, अभिनेत्री रूपाली गांगुली, कुस्तीपटू संग्राम सिंह, अभिनेते पंकज बेरी, कॅप्टन गोपीचंद थोटाकुरा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वर्मा फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी दिव्यम शरण गुप्ता यांनी कालभैरव अष्टक, तामिळनाडूच्या पथकाने भरतनाट्यम, आंध्रप्रदेशच्या पथकाने भथुकम्मा लोकनृत्य, छत्तीसगडच्या पथकाने लोकनृत्य, केरळच्या पथकाने काईकोट्टिकली, पंजाबच्या पथकाने भांगडा, कर्नाटकच्या पथकाने तुला पद्य, दिल्लीच्या पथकाने कथ्थक कलाप्रकाराचे सादरीकरण केले. तर, मध्यप्रदेश, हरियाणा, लक्षद्वीप च्या पथकांनी लोकनृत्य सादर केले. अंदमान आणि निकोबार तसेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांची ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली.
कॅप्टन गोपीचंद थोटाकुरा, उद्योजक नवीन हेगडे, नायिका रुपाली गांगुली, कुस्तीपटू संग्राम सिंग, अभिनेता पंकज बेरी, यशपाल शर्मा, निखत खान हेगडे, साक्षी मादोलकर, वर्मा फाउंडेशनचे श्री वर्मा, यांच्यासह षण्मुखानंद नाट्य विद्यालयाचे प्रतिनिधी, नायर असोसिएशन, बोरीवलीचे सदस्य, अय्यप्पा मंदिर, एलआयसी कॉलनीचे सदस्य, कला विद्या संकुल महाविद्यालय, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मल्याळम समाज नृत्यस्वर पथक, वर्मा फाउंडेशनचे प्रतिनिधी आदींचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
000

WhatsApp