
मुंबई, दि.८ : पर्यावरणाचे संर्वधन आणि विकास यांचा समतोल साधण्यावर राज्य शासनाचा भर आहे. राज्यात वृक्ष व वनक्षेत्राचे प्रमाण वाढवण्यासाठी मिशन मोडमध्ये ३०० कोटी (३ अब्ज) वृक्षलागवडीचा संकल्प राज्य शासनाने केला असून यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा आधार घेत व्यापक कार्यक्रम राबविला जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईतील हॉटेल सहारा येथे नानाजी देशमुख प्रतिष्ठान आणि अमेनिटी ट्री केअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुस-या आंतरराष्ट्रीय आर्बोरीकल्चर परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी आर्यन पांडे,अमेनिटी ट्री केअर फाऊंडेशनचे वैभव राजे यांच्यासह संबंधित मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील वन व वृक्षआच्छादनाचे प्रमाण वाढवण्यासाठी मिशन मोडमध्ये ३०० कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून पर्यावरणीय समतोल राखत शाश्वत विकास साधणे हे राज्य शासनाचे धोरण आहे. आजच्या युगात विकास आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये संघर्ष नाही, तर दोन्ही गोष्टी एकत्रितपणे पुढे नेणे हीच काळाची गरज आहे. राज्याचा विकास आवश्यक असला तरी पर्यावरणाच्या संरक्षणाशी कोणताही तडजोड होऊ शकत नाही.

शाश्वत विकास आणि पर्यावरणीय संतुलन हेच आजचे धोरण असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात राज्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सध्या राज्यातील वृक्ष व वनक्षेत्राचे प्रमाण सुमारे २३ टक्के आहे. ते किमान ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी सुमारे २५० कोटी वृक्षांची आवश्यकता असून सुरक्षिततेच्या दृष्टीने ३०० कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ही वृक्षलागवड केवळ संख्येपुरती मर्यादित न राहता तिचा प्रत्यक्ष परिणाम दिसावा, यासाठी हवामान, माती, स्थानिक परिस्थिती आणि दीर्घकालीन टिकाऊपणा यांचा विचार करून संपूर्ण मोहिमेची वैज्ञानिक रचना केली जाणार आहे. पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारे तज्ज्ञ, संशोधक आणि स्टार्टअप्स यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाईल. लवकरच या क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी स्वतंत्र परिषदही आयोजित करण्यात येणार आहे.

मुंबईतील विकासकामांदरम्यान पर्यावरण संवर्धनाची काळजी घेतली जात असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, किनारी रस्ता प्रकल्पासारख्या मोठ्या प्रकल्पांदरम्यान काही मॅन्ग्रोव्ह क्षेत्रावर परिणाम झाला असला तरी भरपाई स्वरूपात दोन मॅन्ग्रोव्ह उद्याने विकसित करण्यात आली आहेत. परिणामी, फॉरेस्ट सर्वै ऑफ इंडीयाच्या अहवालानुसार मुंबईतील मॅन्ग्रोव्ह क्षेत्र वाढण्यात यश आले आहे.
आर्बोरिकल्चरच्या मदतीने वृक्षांचे आरोग्य तपासणे, त्यांचे संरक्षण करणे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वृक्षांचे संपूर्ण जीवनचक्र नोंदवणे शक्य होत आहे. ‘डिजिटल ट्विन’ सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक वृक्षाची माहिती आणि देखभाल व्यवस्थापन करता येणार आहे. तसेच रस्ते प्रकल्पांमध्ये वृक्ष स्थलांतराची (ट्री ट्रान्सप्लांटेशन) यशस्वीता पूर्वी ३० ते ४० टक्के होती, ती आता सुमारे ८० टक्क्यांपर्यंत वाढली असून नवीन तंत्रज्ञानामुळे ती १०० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न होणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.
भारतीय संस्कृतीत निसर्ग आणि वृक्षांशी सुसंवाद ठेवण्याची परंपरा आहे. वेदकालीन विचारांपासून ते आयुर्वेदातील ‘वृक्ष आयुर्वेद’पर्यंत अनेक ग्रंथांत वृक्षांचे महत्त्व सांगितले आहे. मात्र, काही काळ आपण शाश्वततेचा विचार विसरलो आणि त्यातूनच हवामान बदलासारखी समस्या निर्माण झाली आहे.
परिषदेत सहभागी सर्व तज्ज्ञांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या परिषदेतून मिळालेल्या सूचनांचा शासन निश्चितच पाठपुरावा करेल आणि महाराष्ट्रात पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले उचलली जातील. आपले राज्य स्वच्छ,समृद्ध आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील,असे मुख्यमंत्री म्हणाले.
या दोन दिवसीय परिषदेत विविध वैज्ञानिक सत्रे, संशोधन आणि नवकल्पनांचे सादरीकरण झाले असून या क्षेत्रातील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञांनी भविष्यासाठी धोरणात्मक दिशा मांडली.
००००
वंदना थोरात/वि.सं.अ



















WhatsApp