
मुंबई, दि. ७ : तृतीयपंथीयांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्याबाबत समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे आवाहन विभागीय तृतीयपंथी व्यक्ती हक्काचे संरक्षण व कल्याण मंडळ मुंबई यांनी केले आहे. यामध्ये तृतीयपंथी व्यक्तींना उपलब्ध असलेले संवैधानिक व कायदेशीर अधिकार, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तसेच उपलब्ध सुविधा यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर या मोहिमेत विशेष भर देण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या जनजागृती मोहिमेमध्ये तृतीयपंथी व्यक्तींना प्राप्त होणारे अधिकार, वित्तीय वर्ष २०२६ मधील अर्थसंकल्पीय तरतुदी व त्याअंतर्गत उपलब्ध सुविधा, तसेच महाराष्ट्र शासनाच्या तृतीयपंथीयांच्या विविध धोरणांची व योजनांची माहिती देण्यात यावी. यामध्ये बीज भांडवल योजना (स्वयंरोजगार व उद्योग उभारणीसाठी आर्थिक सहाय्य), विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण व शैक्षणिक सहाय्य, रोजगारातील आरक्षण व समान संधीबाबत शासनाची धोरणे, आरोग्य सेवा, लिंग-पुष्टीकरण आरोग्यसेवा, मानसिक आरोग्य सेवा व आरोग्य विमा सुविधा यांचा समावेश करण्यात यावा. तसेच निवास (गृहनिर्माण) सुविधा, पुनर्वसन योजना, सामाजिक सुरक्षा योजना, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, आर्थिक समावेशन, कायदेशीर मदत, केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना याबाबतची माहितीही व्यापक स्वरूपात प्रसारित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तृतीयपंथी व्यक्तींविषयी संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी शासकीय अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, आरोग्य कर्मचारी, पोलीस विभाग, खासगी क्षेत्रातील नियोजक तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी संवेदनशीलता निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित करण्यावरही भर देण्यात आला आहे. तृतीयपंथी व्यक्तींचे संवैधानिक व कायदेशीर अधिकार, समानता, सन्मान आणि भेदभावमुक्त जीवन याबाबत व्यापक जनजागृती करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे.
दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्रे व डिजिटल माध्यमांतून जनजागृती
मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये जनजागृतीपर साहित्य तयार करून दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्रे, सामाजिक माध्यमे, शासनाचे संकेतस्थळ, डिजिटल माध्यमे, माहितीपट, परिसंवाद, कार्यशाळा तसेच रस्त्यावरची नाटके (स्ट्रीट प्ले) आदी विविध माध्यमांतून राज्यभर प्रसारित करण्याचे आवाहन (विभागीय तृतीयपंथी व्यक्ती हक्काचे संरक्षण व कल्याण मंडळ) यांच्यामार्फत करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे तृतीयपंथी यांच्याविषयी समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास, भेदभाव कमी होण्यास तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे.
00000
आश्विनी पुजारी/विसंअ

WhatsApp