दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने महाराष्ट्र सदनात शपथ – महासंवाद

    - Advertisement -

    नवी दिल्ली, दि. २६ : भ्रष्टाचार निर्मूलन, पारदर्शकता आणि प्रशासकीय कामकाजात सचोटीची मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सदन  येथे आज दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सत्यनिष्ठेची शपथ घेण्यात आली. निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना शपथ दिली.

    दक्षता जनजागृती सप्ताह दि. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. सार्वजनिक प्रशासनात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणे तसेच भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

    यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशांचे श्री गायकवाड यांनी वाचन केले. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि सार्वजनिक जीवनातील नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करून सत्यनिष्ठेच्या तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.

    या कार्यक्रमाला महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, उपअभियंता कुलदीप पाटील, उपअभियंता गंगवार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक सारिका शेलार, प्रमोद कोलपते यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

    0000000

    - Advertisement -