पुणे : परवेज शेख
पिंपरी – आपल्या सहकाऱ्याला दारु न दिल्याच्या करणावरुन हॉटेल मालकाला मारहाण करुन तोडफोड करणाऱ्या पुणे शहर पोलीस दलातील ‘त्या’ राडेबाज पोलीस कर्मचाऱ्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच या पोलीस कर्मचाऱ्याच्या तीन साथीदारांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
अक्षय मोहन धुमाळ (वय 24, रा. भवानीपेठ, पुणे) असे निलंबित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याचे साथीदार अजय विजय खोत (वय 28), मंगेश महेंद्र रोकडे (वय 31), जयंत बालमुकुंद साळुंके (वय 29, सर्व रा. पोलीस वसाहत, भवानी पेठ, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. हॉटेलमालक रामकिसन रमेश खैरनार (वय 32, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन साथीदारांसह अक्षय धुमाळ रविवारी (दि. 4) रात्री हिंजवडी येथे आला होता. ‘आम्ही पोलीस आहोत, तू आमच्या माणासाला त्या दिवशी दारू का दिली नाही’, असे म्हणून त्यांनी रामकिसन यांना शिवीगाळ केली. पोलीस खात्यातील बड्या अधिकाऱ्यांची नावे घेत धुमाळ याने धिंगाणा केला. हॉटेल बाहेरच्या दुचाकींना लाथा मारून त्याने चायनीज दुकानाची काच फोडली. हा सर्व प्रकार सीसीटव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. याप्रकाराची गंभीर दखल घेत अक्षय धुमाळ याचे निलंबन करण्यात आले आहे.