ज्ञानोबा काळे (वय ३९) असे मृत्यू झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. काळे नांदेड येथे नेमणुकीस असताना त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यामुळे सध्या ते गावी होते. काळे राज्य राखीव पोलिस दलात २००४-०५ मध्ये शिपाई म्हणून भरती झाले. त्यानंतर २०१३ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन उपनिरीक्षक झाले होते. त्यांचे प्रशिक्षण ‘१११ बॅच’ सोबत झाले होते. काळे या बॅचचे कॅप्टन होते. बडतर्फ केल्यामुळे ते निराश झाले होते. या प्रकरणी त्यांनी ‘मॅट’मध्ये दाद मागितली होती. नैराश्यात असतानाच त्यांना करोनाची लागण झाली. त्यामध्ये काळे यांचा मृत्यू झाला. काळे यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. त्यांना एक १३ वर्षांची मुलगी व सात वर्षांचा मुलगा आहे. या सर्वांचा आधार तेच होते.
काळे यांचे करोनामुळे निधन झाल्यानंतर १११ डीएन या बॅचच्या ग्रुपवर लातूर येथीस उपनिरीक्षक आवेज काझी यांनी याबाबतचे स्टेट्स ठेवले आणि काळे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. त्यासाठी काझी यांनी बँकेचा खातेक्रमांक दिला. उपनिरीक्षकाच्या ‘१११ बॅच’मध्ये साधारण साडेपाचशे अधिकारी आहेत. काझी यांच्या आवाहनला प्रतिसाद देऊन या बॅचमधील साडेचारशेपेक्षा जास्त जणांनी मदत केली आणि एका दिवसामध्ये २० लाख रुपये खात्यावर जमा झाले. या बॅचमधील व लातूर येथे नेमणुकीस असलेले उपनिरीक्षक आवेज काझी, गजानन क्षीरसागर, नितीन गायकवाड, महेश मुळीक, सदानंद भुजबळ, विकास दांडे यांनी परंडा तालुक्यातील काळेवाडी येथे जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
पोलिस उपनिरीक्षकांच्या ‘१११ डीएन बॅच’कडून जमा झालेली सर्व रक्कम ज्ञानोबा काळे यांचे आईवडील, मुलांच्या नावाने बँकेत एफडी स्वरूपात ठेवली जाणार आहे. सध्या वीस लाख रुपये जमा झाले आहेत. अजूनही मदत येत आहे. दिवंगत पोलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना मदत करून ‘१११ डीएन बॅच’ने आदर्श निर्माण केला आहे.
– आवेज काझी,
उपनिरीक्षक १११ बॅच