दिव्यांगांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ८: आपल्या माणसांच्या जीवनातील अंधार दूर करून आशेचा आणि विश्वासाचा दिवा लावणे म्हणजे खरी दिवाळी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

    शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्र्यांच्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमामुळे ‘नंदनवन’ हे केवळ शासकीय निवासस्थान न राहता खऱ्या अर्थाने दिव्यांग बांधवांसाठी ‘आनंदवन’ बनल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे नंदनवन निवासस्थान सर्वसामान्य, गरजू आणि दिव्यांग बांधवांचे हक्काचे ठिकाण आहे. दिव्यांग बांधवांमध्ये प्रचंड जिद्द आणि चिकाटी आहे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्यच आहे. आजच्या या कार्यक्रमाने माझी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

    यावेळी दिव्यांगांच्या कल्याणासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, दिव्यांगांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळावा यासाठी राज्यात स्वतंत्र ‘दिव्यांग मंत्रालय’ स्थापन करण्यात आले, ज्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांना रोजगार मिळाला व ते स्वतःच्या पायावर उभे राहिले. जिल्हा नियोजन समितीच्या एकूण निधीपैकी एक टक्के निधी हा थेट दिव्यांग बांधवांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात आतापर्यंत दीड हजारांहून अधिक दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात, पाय (जयपूर फूट), वॉकर, श्रवणयंत्र व इतर आवश्यक उपकरणांचे वाटप करून त्यांना नवी उमेद देण्यात आली आहे. हा उपक्रम केवळ एका शहरापुरता मर्यादित न ठेवता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचवला जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

    जन्मजात हृदयविकार असलेल्या बालकांच्या महागड्या शस्त्रक्रिया तसेच कॉक्लिअर इम्प्लांटमुळे ऐकू-बोलू लागलेल्या मुलांच्या कुटुंबीयांसोबतही नुकतीच दिवाळी साजरी केली. या मुलांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद हा वेगळे समाधान देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

     

    यंदा दुष्काळामुळे शेतकरी संकटात असून उद्या जालन्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, टोकाचे पाऊल उचलू नये. सरकार खंबीरपणे त्यांच्या पाठीशी असून समाजातील हजारो हातांनीही मदतीसाठी पुढे यावे. ही राजकारणाची नव्हे, तर संकटग्रस्तांच्या पाठीशी माणुसकीने उभे राहण्याची वेळ आहे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

    यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिव्यांग बांधवांसमवेत फराळ केला. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटवस्तू देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

    ००००

    - Advertisement -