
छत्रपती संभाजीनगर, दि. ८ (जिमाका)– दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी आणि दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांच्यासोबत आहोत, ही भावना रुजविण्यासाठी आज राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवगड तांडा येथे जाऊन शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली. त्यांना मिठाई, भेटावस्तु व शिधा वाटप केले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार, यंदा दिवाळीत शेतकऱ्यांच्या सोबत, गावात जाऊन दिवाळी साजरी करण्यात येत आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानुसार दुष्काळग्रस्त नागरिकांना दिवाळीची भेट म्हणून जीवनावश्यक वस्तूंच्या शिध्याचे वाटप करण्यात येत आहे.

यानिमित्त आज पालकमंत्री शिरसाट यांनी आज शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करीत माणुसकीचा संदेश दिला.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शिवगड तांडा येथे दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांची भेट घेण्यात आली. यावेळी शेतकरी रंगनाथ नाना नवगिरे यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांना कपडे, फराळ, मिठाई देत आपुलकीने संवाद साधण्यात आला. या भेटीतून शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा आणि संकटाच्या काळात त्यांना आधार देण्याचा संदेश देण्यात आला.

दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई, फराळ आणि आनंदाचा उत्सव नसून गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचाही सण आहे. याच भावनेतून दुष्काळग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना या उपक्रमातून मदतीचा हात देण्यात आला.

संकट कितीही मोठे असले तरी सामान्य माणसाला एकटे न सोडता त्याच्या अडचणीच्या काळात खंबीरपणे साथ देणे, हीच माणुसकी असल्याची भावना यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी व्यक्त केली. प्रत्येक गरजू कुटुंबाच्या घरात दिवाळीचा आनंद पोहोचावा आणि त्यांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
शेतकरी, सामान्य माणूस हा केंद्रबिंदू असून त्यांना दुष्काळासारख्या आपत्तीत आम्ही सारे आपल्या सोबत आहोत असा दिलासा देणे महत्त्वाचे आहे, असेही श्री. शिरसाट यांनी सांगितले. याशिवाय पालकमंत्री शिरसाट यांनी वडगाव कोल्हाटी,प्रति पंढरपूर, सातारा परिसर इ. ठिकाणी शिधा वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्यांचे समवेत स्थानिक पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

WhatsApp