
धुळे, दि. १२ (जिमाका): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत धुळे जिल्ह्यातील 3,598 पात्र शेतकऱ्यांचा दुसऱ्या कर्जमुक्ती यादीत समावेश करण्यात आला आहे. शासनाने आज प्रसिद्ध केलेल्या या यादीमुळे संबंधित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यादीतील शेतकऱ्यांनी कर्ज थकबाकीची खातरजमा करून नजीकच्या आपले सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे आणि शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे.
पालकमंत्री रावल म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये ही योजना सुरू केली आहे. योजनेत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेल्या, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज तसेच पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जास 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
राज्यात 3.55 लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी
योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून शासनाने त्यासाठी महाआयटीची नियुक्ती केली आहे. महाआयटीने तयार केलेल्या योजना पोर्टलवर बँकांनी 31.17 लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. संगणकीय संस्करणानंतर 16.96 लाख पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांपैकी 12.58 लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर 10,114.90 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यापैकी 7 ऑगस्ट 2026 रोजी 6.22 लाख शेतकऱ्यांना 5,028.60 कोटी रुपये, तर 24 ऑगस्ट 2026 रोजी 6.36 लाख शेतकऱ्यांना 5,086.30 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला.
आता योजनेअंतर्गत 3 लाख 55 हजार 614 पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी 11 सप्टेंबर 2026 रोजी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये धुळे जिल्ह्यातील 3,598 शेतकऱ्यांचा समावेश आहे. नाशिक विभागातील एकूण 25,471 लाभार्थ्यांमध्ये अहिल्यानगर 9,404, धुळे 3,598, जळगाव 7,316, नंदुरबार 1,345 आणि नाशिक जिल्ह्यातील 3,808 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
पालकमंत्री रावल यांनी धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. यादीत समाविष्ट सर्व 3,598 शेतकऱ्यांनी आवश्यक आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे आणि संबंधित यंत्रणांनीही लाभार्थ्यांना प्रक्रिया सुलभपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे, असे त्यांनी म्हटले आहे.
यादी बँक शाखा, विकास संस्था व ग्रामपंचायतींमध्ये
दुसऱ्या यादीतील लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी परिशिष्ट ‘अ’ आणि बँकनिहाय यादी परिशिष्ट ‘ब’मध्ये देण्यात आली आहे. संबंधित लाभार्थ्यांची यादी बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही कर्जमुक्तीची यादी असून यादीतील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
धुळे जिल्ह्यातील दुसऱ्या यादीत जिल्हा बँकेशी संबंधित 152 लाभार्थी आहेत. राज्यस्तरावरील दुसऱ्या यादीत एकूण 3 लाख 55 हजार 614 लाभार्थ्यांपैकी 41,051 जिल्हा बँकांशी, तर 3 लाख 14 हजार 563 व्यापारी बँकांशी संबंधित आहेत.
आधार प्रमाणीकरणानंतर कर्जखात्यात रक्कम
या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची रक्कम 31 मार्च 2026 रोजीची आहे. 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी 31 मार्च 2026 रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करून नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या कर्जखात्यावर जमा करण्यात येणार आहे.
राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांच्या बाबतीत या यादीतील काही शेतकऱ्यांची 31 मार्च 2026 रोजीची कर्ज थकबाकी 2 लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअरकट’ धोरणानुसार ही सर्व कर्जे निरंक करण्यात येणार आहेत.
योजनेतील पात्र लाभार्थ्यांमध्ये मृत शेतकरी तसेच वयोवृद्ध व बोटांच्या ठशाची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी शासनाने 19 ऑगस्ट 2026 रोजी स्वतंत्र मानक कार्यप्रणाली (SOP) निर्गमित केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी महत्त्वाची योजना आहे. धुळे जिल्ह्यातील दुसऱ्या यादीत समाविष्ट सर्व 3,598 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करून कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा. बँका व संबंधित यंत्रणांनीही लाभार्थ्यांना आवश्यक सहकार्य करून ही प्रक्रिया अधिक सुलभ करावी,” असे आवाहन पालकमंत्री रावल यांनी केले आहे.
०००

WhatsApp