‘माफसू’च्या विकासकामांना गती देण्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ११ : पशुवैद्यक विज्ञान व पशुसंवर्धन पदवी (बीव्हीएससी अँड एएच) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना इतर वैद्यकीय शाखांप्रमाणे १८ हजार रुपये विद्यावेतन करण्याच्या प्रस्तावानुसार ४ कोटी १२ लाख रुपयांची तरतूद करण्याबाबतच्या प्रस्तावाला आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता घेण्यात यावी. विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावून विद्यार्थ्यांना हॉस्टेलसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

    मंत्रालयात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरच्या (माफसू) शैक्षणिक, प्रशासकीय तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांचा पशू व मत्स्य संवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, अधिष्ठाता डॉ. शिरीष उपाध्ये, कुलसचिव मोना ठाकूर, उपकुलसचिव डॉ. ए. पी. गांवडे, सहसचिव नि. भा. मराळे उपस्थित होते.

    पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, विद्यापीठातील शिक्षकेतर पदांच्या भरती प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. यावेळी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर पदांची भरती गतीने करण्याची कार्यवाही करण्यात यावी. भारतीय पशु चिकित्सा परिषदेच्या (व्हिसीआय) मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक शिक्षकवर्ग उपलब्ध करून देण्यासाठी या भरती प्रक्रियेला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

    मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा व बांधकाम प्रकल्प कामांची सद्यस्थिती तपासून पाहा. शैक्षणिक इमारती, रुग्णालये तसेच वसतिगृहांच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये मुंबई, नागपूर, परभणी, शिरवळ, उदगीर, वरूड, मोर्शीचा समावेश आहे. या कामांचे प्रगतीनिहाय अहवाल करून ही कामे गतीने करा अशा सूचना त्यांनी केल्या.

    विद्यार्थ्यांचे विद्यावेतन व इंटर्नशिप भत्ता तसेच पशुवैद्यकीय व दुग्ध तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या शुल्क संरचनेबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित प्रकरणांमध्ये आवश्यक कार्यवाही वेगाने पूर्ण करावी. विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावणे, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधा व बांधकाम प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करणे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर पदांची भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने राबवावे. यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. 

    0000

    अश्विनी पुजारी/विसंअ

    - Advertisement -