धुळे: ९वीच्या विद्यार्थिनीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

- Advertisement -

धुळे:  भरधाव ट्रकच्या चाकाखाली सापडून नववीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी धुळ्यातील साक्री रस्त्यावर सिंचन भवनसमोर घडली. गुंजन पाटील असं मृत मुलीचं नाव असून, कमलाबाई कन्या शाळेत ती शिकत होती. ती सकाळी स्कॉलरशिपच्या क्लासला निघाली होती. त्यावेळीच तिच्यावर काळानं घाला घातला. 

गुंजन साक्री रस्त्यावर सेंट्रल बँकेच्या मागे राहत होती. ती आज सकाळी स्कॉलरशिपच्या क्लाससाठी घरातून बाहेर पडली. मैत्रिणीला सोबत घेण्यासाठी ती रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी साक्रीकडून धुळ्याकडे येणाऱ्या भरधाव ट्रकच्या मागच्या चाकाखाली ती सापडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील व्यावसायिक, रहिवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही वेळ तिथे तणावही निर्माण झाला होता. गुंजनचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच तिचे आई-वडीलही घटनास्थळी पोहोचले. मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घटनास्थळी मोठी गर्दीही झाली होती. साडेसातच्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गर्दीला पांगवले. गुंजनचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. 

गुंजनच्या घरची परिस्थिती बेताची आहे. तिचे वडील हे साक्री रस्त्यावर एका हार्डवेअरच्या दुकानात काम करतात. गुंजन शाळेत हुशार होती. आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत ती शाळेतून पहिली आली होती. मुलीला शिकवून मोठं करण्याचं स्वप्न वडिलांनी पाहिलं होतं. परंतु अपघाताने या स्वप्नांचा चुराडा केला. गतिरोधक असते तर कदाचित गुंजन वाचली असती, असं तेथील स्थानिक सांगत होते. काही दिवसांपूर्वी शाम सोनवणे (वय ४०) यांचाही या रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला होता. 

- Advertisement -