
मुंबई, दि. २५ : उत्तर महाराष्ट्रातील सिंचन विकासाला नवी दिशा देतानाच आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना देणाऱ्या महत्त्वाकांक्षी नर्मदा-तापी वळण योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५ हजार ५४८ कोटी ४ लाख रुपयांच्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री (विदर्भ तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) गिरीश महाजन यांनी दिली.
या निर्णयामुळे नर्मदा खोऱ्यात महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले पाणी तापी खोऱ्यात वळविण्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा आणि धडगाव या तालुक्यांतील ७५ गावांना सिंचनाचा लाभ मिळणार असून, एकूण २६ हजार ५२६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तसेच परिसरातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढविण्यासही मदत होणार आहे.
जळगाव येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत प्रस्तावित असलेल्या या योजनेद्वारे नर्मदा पाणी तंटा लवादाच्या अंतिम निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले नर्मदा खोऱ्यातील पाणी तापी खोऱ्यात आणण्यात येणार आहे. यासाठी सहा वळणबंधारे, जोडकालवे आणि बोगद्यांची उभारणी करण्यात येणार असून, उत्तर महाराष्ट्रातील जलसंपत्तीचा अधिक प्रभावीपणे विनियोग करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या योजनेअंतर्गत नर्मदा खोऱ्यातील खडकी, लेकडा, वेलखेडी, मोंजरा, राजबर्डी आणि शेलकुई येथे सहा वळणबंधारे बांधण्यात येणार आहेत. या बंधाऱ्यांद्वारे १५८.३० दशलक्ष घनमीटर (५.५९ टीएमसी) पाणी बोगदे आणि जोडकालव्यांच्या माध्यमातून जलोला धरणात आणून साठविण्यात येईल. तेथून १९.५० किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे हे पाणी तापी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून ११.५० मेगावॅट वीजनिर्मितीही करण्यात येणार आहे.
तापी खोऱ्यात आणलेले पाणी गोपालपूर बंधाऱ्यात (पिकअप वेअर) साठविण्यात येईल. त्यानंतर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे (Pressure Distribution Network – PDN) शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. या प्रणालीमुळे उपलब्ध पाण्याचे नियोजनबद्ध आणि कार्यक्षम वितरण शक्य होणार आहे.
या योजनेमुळे तळोदा तालुक्यातील १४ हजार ११६ हेक्टर, शहादा तालुक्यातील ९ हजार ४१० हेक्टर आणि धडगाव तालुक्यातील वैयक्तिक उपसा सिंचनाद्वारे ३ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. अशा प्रकारे एकूण २६ हजार ५२६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, जिल्ह्यातील ७५ गावांमधील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे.
प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सविस्तर सर्वेक्षण, प्रकल्पाचे संकल्पन व आराखडे तयार करणे, आवश्यक वैधानिक मान्यता प्राप्त करणे, वनजमिनीचे संपादन तसेच विविध बांधकाम घटकांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या सर्व कामांसाठी ५ हजार ५४८.०४ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
नर्मदा खोऱ्यातील पाणी तापी खोऱ्यात वळविण्याच्या या निर्णयामुळे नंदुरबार जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त आणि आदिवासीबहुल भागाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. शेतीसाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध झाल्याने पावसावरील अवलंबित्व कमी होण्यास, कृषी उत्पादनात वाढ होण्यास आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास व त्यांचे आर्थिक स्थैर्य बळकट होण्यास मदत होणार आहे. परिणामी, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून या भागाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला नवी गती मिळेल.
आदिवासीबहुल भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे आणि शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा मिळावी, या उद्देशाने राबविण्यात येणारी नर्मदा-तापी वळण योजना हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. राज्यातील जलसंपत्तीचा नियोजनबद्ध, प्रभावी आणि लोकहितकारी विनियोग करून उत्तर महाराष्ट्रातील सिंचन विकासाला गती देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
-
५,५४८.०४ कोटी रुपये – प्रकल्पाच्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता.
-
१५८.३० दशलक्ष घनमीटर (५.५९ टीएमसी) – नर्मदा खोऱ्यातून तापी खोऱ्यात वळविण्यात येणारे पाणी.
-
६ वळणबंधारे – खडकी, लेकडा, वेलखेडी, मोंजरा, राजबर्डी आणि शेलकुई येथे उभारणी.
-
१९.५० किलोमीटर – पाणी वळविण्यासाठी बोगद्याची लांबी.
-
११.५० मेगावॅट – प्रस्तावित वीजनिर्मितीची क्षमता.
-
२६ हजार ५२६ हेक्टर – सिंचनाचा लाभ मिळणारे एकूण क्षेत्र.
-
७५ गावे – नंदुरबार जिल्ह्यातील लाभार्थी गावे.
-
तीन तालुके – तळोदा, शहादा आणि धडगाव येथील शेतकऱ्यांना लाभ.
-
शाश्वत सिंचन, पाण्याची उपलब्धता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना – प्रकल्पाचे व्यापक उद्दिष्ट.
००००
किरण वाघ/विसंअ

WhatsApp