नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी जालना जिल्ह्यात शाळा गुणवत्ता विकास कार्यक्रम – पालकमंत्री पंकजा मुंडे – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १८ : – नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी जालना जिल्ह्यात शाळा गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असून विविध शासकीय यंत्रणांनी मंजूर विकासकामे कालमर्यादेत पूर्ण करावीत. तसेच योजनांची वेळेत अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

    जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या विकासकामांचा पालकमंत्री मुंडे यांनी आढावा घेतला. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया तसेच विविध विभागांचे प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पंकजा मुंडे  म्हणाल्या,  जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी उपकेंद्रे, ट्रान्सफॉर्मर आणि रोहित्रांची क्षमता वाढविण्यासह विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी तरतूद करण्यात आली असून, या कामांमुळे दुष्काळी परिस्थितीत दिलासा मिळण्यास मदत होईल. सौर हायमास्ट उभारणीसाठीही निधीची तरतूद करण्यात येत आहे.

    जिल्ह्यातील विकासकामांसाठी उपलब्ध निधी अखर्चित राहू नये, यासाठी विविध शासकीय यंत्रणांकडून कालमर्यादेत कामे पूर्ण करून घेण्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, असे पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले. जिल्हा जलसंधारण विभागाला उपलब्ध झालेला अपेक्षित निधी खर्च न होणे ही गंभीर बाब आहे. निधी परत जाणार नाही, यासाठी कामांना प्रशासकीय मान्यता वेळेत मिळण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

    नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नगरपरिषद क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयांची उभारणी आणि शाळा गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी १५ कोटी ६६ लक्ष रुपये तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण व सक्षमीकरणासाठी ४ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, गरजू दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा आणि विविध साहाय्यभूत साधने देण्यात येणार आहेत. महिलांचे सक्षमीकरण आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी रेशीम उद्योगाच्या माध्यमातून साडीनिर्मिती व्यवसाय उभारण्यास मदत करावी. यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात. दुष्काळी परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रे व शाळांच्या दुरुस्ती कामांना अडसर नाही असेही पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले.

    ०००००

    किरण वाघ/विसंअ

     

    - Advertisement -