कोल्हापूर दि. १५ (जिमाका): महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था म्हणजे केवळ मंत्रालयातील फाईल, शासन निर्णय किंवा मोठ्या रुग्णालयांच्या इमारती नाहीत तर राज्यातील सामान्य जनता, बालके, बळीराजाचे आरोग्य, वृद्धांची काळजी आणि सामान्य नागरिकांचे आरोग्य जपणे याला आरोग्य व्यवस्थेने प्राधान्य दिले आहे. ‘ निरोगी महाराष्ट्र – सुदृढ महाराष्ट्र ‘ साठी आरोग्य विभाग काम करेल असा ठाम विश्वास आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज व्यक्त केला.

राज्यातील महिला आरोग्य समिती (MAS) जन आरोग्य समिती (UPHC – UHWC) तसेच रुग्णकल्याण समिती (UCHC) सदस्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधत आरोग्य व्यवस्थेतील सद्यस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी पालकमंत्री म्हणाले, राज्याला 1400 डॉक्टर उपलब्ध झाले असून त्यांची नियुक्ती येत्या आठवड्याभरात करण्यात येईल. त्याचबरोबर 600 डॉक्टरांसाठी आरोग्य विभागाने जाहिरात काढली आहे. तसेच सुमारे 250 दंतचिकित्सक आरोग्य सेवेसाठी उपलब्ध झाले आहेत. राज्याच्या आरोग्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही. विविध समित्यांमार्फत आज सुमारे सहा लाखांहून अधिक नागरिकांशी आरोग्य विभागाने संवाद साधला आहे. भविष्यात यामध्ये आणखीन चार लाख लोकांचा समावेश करण्यात येऊन या सर्वांकडून आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यात येईल. आरोग्य विषयक समस्यांसाठी लवकरच ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात येईल. त्याचबरोबर स्थानिक बचत गटाच्या माध्यमातून रुग्णांना सकस व पोषक आहार देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आबिटकर यांनी आरोग्य सेवेबाबत राज्यातील विविध लोकप्रतिनिधींच्या भावना जाणून घेतल्या. त्यावर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य विभागाने त्यांच्याबाबतीतील तक्रारीं विषयी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावा तसेच सरकारी दवाखान्यातील अनुपस्थित डॉक्टरांच्या अनुषंगाने आठवड्यात एक दिवस निश्चित करून आढावा बैठक घ्यावी अशी सूचना केली. या सूचनेला पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली. या आरोग्य जनसंवादात आरोग्य विभागांतर्गंत कार्यरत असणाऱ्या कमिट्यांच्या किती मीटिंग झाल्या ? पेशंट दवाखान्यात येतात का ? डॉक्टर वेळेवर येतात का ? डॉक्टर रुग्णांची कसा संवाद साधतात ? तसेच ते रुग्णालयात उपस्थित असतात का ? यासारखे अनेक प्रश्न आरोग्यमंत्र्यांनी या आरोग्य संवादात विचारले. या संवाद कार्यक्रमामध्ये ऑनलाईन पद्धतीने आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार,सुरेश धस, राजाभाऊ तोडसा आदी सामील झाले.

राज्याला अनेक वर्षानंतर एक सक्षम आणि कर्तृत्ववान आरोग्यमंत्री लाभल्याचे सांगून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे कौतुक करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याच्या बाबतीत देशात महाराष्ट्र एक वेगळी उंची गाठेल, असा विश्वास व्यक्त केला.
राज्यातील या पहिल्यावहिल्या अभिनव अशा जन आरोग्य ऑनलाईन उपक्रमात राज्यातून बीड, तुळजापूर, पालघर, धाराशिव, नंदुरबार, जालना, अमरावती, मोर्शी आदी ठिकाणांहून मोठ्या संखेने नागरिक सहभागी झाले होते.
०००









WhatsApp