शेतकरी हितासह सर्वांगीण विकासावर भर – पालकमंत्री अतुल सावे

- Advertisement -


नांदेड दि. 15 ऑगस्ट :- ‘हर घर तिरंगा’ अभियानाला नांदेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनंदन करतानाच शेतकरी, महिला, विद्यार्थी, कामगार व वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या सर्वांचे स्मरण करुन त्यांनी यावेळी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या समारंभास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर,  महापौर कविता मुळे, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक त्यांचे वारसदार, माजी सैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, विभाग प्रमुख, पत्रकार, नागरिक, विद्यार्थी यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील जवळपास 13 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, सुमारे 106 कोटी 25 लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. यासोबतच शेतकऱ्यांना वीजबिलात सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही शासनाने घेतला असून, कर्जाचा भार कमी करण्याबरोबरच शेतीच्या वीज खर्चात दिलासा देण्याचे काम शासन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला शेतकऱ्यांसाठी मदत कक्ष

महाराष्ट्र शासनाने ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026’ नुकतेच मंजूर करून शेती व शेतीपूरक व्यवसायात कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात ‘महिला शेतकरी मदत कक्ष’ सुरू करण्यात आला असून, या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना, सुविधा व हक्कांबाबत मार्गदर्शन आणि मदत मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

मतदारांनी गणनापत्रक जमा करण्याचे आवाहन

जिल्ह्यात मतदार याद्यांच्या SIR प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात असून, जिल्हा प्रशासनाने या कामात उल्लेखनीय प्रगती केली आहे. मात्र, ज्या मतदारांनी अद्याप गणनापत्रक भरून दिलेले नाही, त्यांनी विहित मुदतीत ते BLO कडे जमा करावेत असे आवाहन पालकमंत्री श्री. सावे यांनी केले.

महाभूसंपादन लडार’ प्रणालीचे कौतुक

भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता, गतिमानता आणि सुलभता आणण्यासाठी ‘महाभूसंपादन व लडार’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्याच्या या उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपजिल्हाधिकारी प्रियंका कर्डिले, उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी आणि त्यांच्या टीमचे कौतुक पालकमंत्री सावे यांनी केले. तसेच कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील बबनराव पेठकर यांनी मुलाच्या विवाह सोहळ्यात 3 हजार 365 नागरिकांचा विमा उतरवून राबविलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचा आदर्श सर्वानी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठीही मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामातील 99 टक्के पेरणी पूर्ण झाली असून पिकांची स्थिती चांगली आहे. शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी प्रशासन दक्षतेने काम करीत असल्याचे पालकमंत्री सावे यांनी सांगितले.

15 ते 21 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ‘जलसंधारण सप्ताहात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे

माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी, 21 ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार असून, 15 ते 21 ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ राबविण्यात येणार आहे. या सप्ताहात जलसंधारणाचे महत्त्व, गाळमुक्त व जलयुक्त गावांची संकल्पना तसेच पाण्याच्या काटकसरीने वापराबाबत जनजागृती केली जाणार आहे. या सप्ताहात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यात विविध योजनांतर्गत 341 किलोमीटर लांबीच्या नदी व नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले असून, 47 लाख 54 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. जलसाठवण क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने ही कामगिरी महत्त्वपूर्ण असल्याचे पालकमंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आणि प्रशासन कटिबद्ध असून, जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ध्वजारोहणानंतर सलामी देण्यात आली.  सलामी पथक कमांडर राखीव पोलीस निरीक्षक विजयकुमार धोंडगे यांनी सलामी पथकाचे नेतृत्व केले. पोलीस दलाच्या सलामीनंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत, राज्यगीत नंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक,  त्यांचे कुटूंबिय यांची विचारपूस केली. वीरमाता, वीरभगीनी यांच्यासह या विशेष कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना भेटून शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर शेवटी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत व राज्यगीत झाले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पंडागळे आणि श्रीमती अंजली नातू यांनी केले.

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार 

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. त्यांचा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी यांना अति उत्कृष्ट सेवा पदक, उत्कृष्ट सेवा पदक पुरस्कार जाहीर केले आहे. यात विठ्ठल श्रीमंतराव खोमणे व गंगाराम हनमंतराव जाधव यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक तर राजेंद्र राजलिंग सिटीकर, दीपक राजाराम पवार, दत्ता रामचंद्र सोनुले, दिगांबर किशनराव मुसळे, गजानन बळीराम कदम, संतोष परसराम वाघ, सतिश दत्तात्रय मुधोळकर, माधव नारायण येईलवाड, महेश दुर्गय्या बुडगु यांचा पालकमंत्री यांनी  सन्मान केला. तसेच दिनांक 11 जानेवारी, 2023 रोजी नक्षलग्रस्त भागात ऑपरेशन “जुवेन्तुस” झारखंड राज्यात जखमी झालेल्या शिपाई फारुकी शाहारुखखान आजिजखान यांचा ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला.

दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत शिवाजी नामदेव घोरबांड व श्रीमती अंजना पद्माकर कौसल्ये-अस्थिव्यंग तर गणेश देविदासराव कदम-अव्यंग व श्रीमती ज्योती निवृत्ती तेलंग-अस्थिव्यंग यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन विवाहित जोडप्यांचा सन्मान करण्यात आला.

सन 2023-24 राज्यस्तरीय पीक स्पर्धा खरीप व रब्बी हंगामात विजेते शेतकरी माधव शंकरराव पाटील, सुनिल नामदेव चिमणपाडे, रत्नाकर गंगाधर ढगे, सुभाष विश्वनाथ यलसटवाड यांचा यांचा सन्मान केला.

माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी पाणी आडवा-पाणी जिरवा मोहिम राबवून जलसंधारणाचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्याप्रित्यर्थ 15 ते 21 ऑगस्ट या कालावधीत जलसंधारण सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत सीएसआर निधीतून यशस्वी नियोजन व प्रभावी अंमलबजावणी केल्याबाबत इंडो ग्लोबल सोशल सर्व्हिस सोसायटी, धर्माबाद, डियाजिओ इंडिया, धर्माबाद, अव्दिक सस्टेनेबल सोल्यूशन, नांदेड या संस्थेचा सन्मानपत्र देऊन पालकमंत्री यांनी गौरव केला. तसेच यावेळी जलसंधारण विभागाच्या लोगोचे अनावरण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्याचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.



Source link

- Advertisement -