नेमचि येतो… त्रस्त पावसाळा

नेमचि येतो… त्रस्त पावसाळा
- Advertisement -

नेमेचि येतो, त्रस्त पावसाळा.. असे अनेक लोकवस्त्यांमधील रहिवाशांना वाटू लागते. दरवर्षी महापालिकांनी कितीही दावे केले, तरी त्याच त्या ठिकाणी पहिल्याच पावसात हमखास पाणी साचते आणि घराबाहेर पडणेही मुश्किल होऊन बसते. रुग्णांना नौकांनी न्यावे लागल्याचीही उदाहरणे आहेत. अशा त्रस्त पावसाळ्याची ही काही उदाहरणे. महापालिकांनी या उदाहरणांवरून आपल्या नियोजनात काही धडे घ्यायला हवेत.


ठाणे

अपुऱ्या मान्सूनपूर्व कामांचा घोडबंदरला फटका

ठाणे शहरातील टोलेजंग गृहसंकुलांचा परिसर असलेल्या घोडबंदर पट्ट्यामध्ये काही वर्षांमध्ये सातत्याने पाणी साचण्याच्या घटना समोर येत आहेत. रुंद रस्ते, नियोजित इमारती, पायाभूत सुविधांची व्यवस्था असलेल्या या सुसज्ज गृहसंकुलांमध्ये पाणी साचण्याच्या घटनांमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. तळमजल्यांवरील दुकाने पाण्याखाली जाण्याबरोबरच रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे प्रवास करणेही धोक्याचे होत आहे. घोडबंदरपासून रेल्वे स्थानक, बाजारपेठांपासून दूर असल्याने ठाणे शहरात जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागतो. परंतु पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून वाहने चालवणे म्हणजे अपघाताला निमंत्रण असते. घोडबंदर परिसरात राहणारे आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये सक्रिय दीपक मेजारी यांनी या पाणी साचण्याला मान्सूनपूर्व कामांमधील दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा दावा केला. घोडबंदर परिसरातील सर्व व्यवस्था अत्याधुनिक असून पाणी वाहून जाण्यासाठी भूमिगत वाहिन्यांची क्षमताही मोठी आहे. परंतु मान्सूनपूर्वीच्या कामांदरम्यान त्यांची व्यवस्थित देखभाल होत नसल्याने पाण्याचा प्रवाह थांबतो. त्यामुळे पावसाचे पाणी साचून शहरात पाणी साचण्याच्या घटना घडतात. नागरिकांचा हा त्रास टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे शिस्तबद्ध, अत्यंत नियोजन पद्धतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे.

कशेळी-काल्हेर जलप्रलयाच्या तोंडावर

ठाणे शहरापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असलेले कशेळी-काल्हेर गेल्या दहा वर्षांमध्ये अनधिकृत बांधकामांमुळे जलप्रलयाच्या काठावर येऊन पोहोचले आहे. दहा वर्षांपूर्वी अत्यंत विरळ वस्तीच्या भिवंडी तालुक्यातील या दोन ग्रामपंचायती सध्या सर्वात दाट लोकवस्तीची शहरे होण्याकडे वाटचाल करत आहेत. विशेष म्हणजे नियोजनाच्या अभावामुळे निर्माण होणारे टोलेजंग गृहसंकुलांच्या तुलनेत पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. पाणथळ भूमी, खारफुटींची जंगले आणि खाडीतील अतिक्रमणांमुळे हा परिसर पाण्याखाली जाण्याचे प्रकार दोन ते तीन वर्षांमध्ये सातत्याने वाढले आहेत. कशेळी-काल्हेर या दोन गावांकडे नियोजन प्राधिकरणांनी लक्ष न दिल्यास ही गावे जलप्रलयामध्ये बुडून जाण्यास जास्त वेळ लागणार नाही. कशेळी-काल्हेर परिसरात भूमाफियांची मोठी दहशत असल्याने याविरोधात उघडपणे बोलण्यास नागरिक सहसा धजावत नाहीत. याचा फायदा घेत येथील तलाव, खाडीकिनारे आणि पर्यावरणाचा ऱ्हास करून अनधिकृत बांधकामे उभी केली जात आहेत.

राम-मारूती रस्ता अपघाताला निमंत्रण

नौपाड्यातील राम मारूती रस्ता अत्यंत सखल भागात असल्याने पाऊस वाढल्यानंतर या भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. तळमजल्यावरील अनेक दुकाने पाण्याखाली जातात. रस्त्यावरील वाहनांचेही पाणी साचून नुकसान होत असल्याचे प्रकार गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने घडत आहेत. या भागात अनेक रुग्णालये, दुकाने आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारी कार्यालये आहेत. परंतु पावसाचा जोर वाढल्यानंतर येथील सर्व दुकाने बंद राहतात. संपूर्ण परिसर जलमय झाला असतो. विशेष म्हणजे या काळात घराबाहेर पडणे म्हणजे अपघाताला निमंत्रण दिल्यासारखे असल्याचे येथील स्थानिकांना वाटून जाते.

मासुंदा तलाव परिसर पाण्यात

ठाणे शहरातील मासुंदा तलावाच्या परिसरातील शिवाजी मार्गावरील भाग पाण्यामध्ये कायम बुडालेला असल्याने या भागातून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे. रस्त्यावरून चालणे शक्य नसल्याचे येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांचे म्हणणे आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून जांभळी नाक्यावर जाण्यासाठी शिवाजी रस्त्याचा वापर केला जातो. परंतु सॅटिस पूल मासुंदा तलावाच्या बाजूला उतरतो. त्याच्या बाजूला असलेले उद्यान आणि उड्डाणपुलाच्या खालचा रस्ता पावसाळ्याचे सर्व महिने पाण्याखाली असतो, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. शहरात मुसळधार पाऊस पडल्यास वृंदावन आणि श्रीरंग सोसायटी परिसरात हमखास पूरपरिस्थिती निर्माण होते. हा संपूर्ण भाग सखल असून याठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पाणी का साचते, याकडे कोणीच लक्ष देत नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. पूर्वी वृंदावन सोसायटी परिसरात पाणी साचत नव्हते. मात्र, आता हा परिसरही पावसाळ्यात पूर्णपणे जलमय होत असल्याचे रहिवासी सांगतात. अर्धा तास पाऊस पडल्यास हमखास वृंदावन आणि श्रीरंग परिसराला तळ्याचे स्वरूप येते. हा त्रास किती वर्षे सहन करायचा, असा प्रश्न प्रमोद सावंत यांनी उपस्थित केला. येथील नालेसफाई व्यव्यस्थित होत नसल्याने मोठा पाऊस पडल्यास पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचे अन्य एका जागरूक नागरिकाचे म्हणणे आहे. सुमारे ७० एकरच्या या भागातील ७० टक्के भागामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याचे त्याने सांगितले.

मुंब्रा, कळवा, दिवा

पावसाचे पाणी घरात…

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे मुंब्रा, कळवा आणि दिव्यातील नागरिकांचे हाल झाले. सखल परिसर तसेच तलाव, नाल्याच्या बाजूला असलेल्या दिवा, मुंब्रा आणि कळव्यातील नागरिकांना पावसाळ्यातील चार महिने अनेक संकटांना तोंड देत दिवस काढावे लागणार आहे. केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या परिसरातील नागरिकांना दरवर्षी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. मुंब्र्यात नालेसफाई न झाल्यामुळे नाल्यातील कचरा वाहून थेट रस्त्यावर आल्याने प्रचंड दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले असून अनेक संसर्गजन्य आजारांना आमंत्रण दिले जात आहे. दिवा परिसरात पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेला. पाणीटंचाईलाही नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. कळव्यातही अनेक दुकाने, घरांमध्ये पाणी शिरले. रस्ता, पाणीटंचाई, पावसाचे पाणी घरात, वीज, कचरा, नालेसफाई या प्रश्नांमुळे कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील नागरिकांची दैना उडाली. कळव्यातील शिवाजीनगर, महात्मा फुलेनगर, मुंब्र्यातील रेतीबंदर, कौसा येथील मित्तल कंपाऊंड, शीळ येथील दत्त मंदिर परिसर आणि दिवा परिसरांतील नाल्यांतील गाळ पूर्णपणे न काढल्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे. कळव्यात जोरदार पावसामुळे अनेक वेळा वीज जाते, त्यामुळे प्रचंड पाणीटंचाई निर्माण होते. एकीकडे पाऊस कोसळत असला, तरी घरात पाणी नाही, अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे सुरज पाटील यांनी सांगितले. दिव्यातील दोन्ही बाजूंनी रस्त्यांचे काम सुरू केल्याने या परिसरात चिखल पसरला आहे. महापालिका हद्दीत नालेसफाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना दरवर्षी सहन करावा लागतो. लोकप्रतिनिधी येतात पाहणी करून जातात, मात्र यावर तोडगा काही निघत नसल्याचे दिव्यातील शिला यादव यांनी सांगितले.

कल्याण

थोड्याशा पावसानेही अडचण

कल्याण पूर्वेकडील स्थानकापासून जवळच असलेल्या लोकग्राम समर्थनगर परिसरात दरवर्षी थोड्याशा पावसातदेखील पाणी साचते. तीन चाळींतील ४० घरे सतत पाण्याखाली जातात, मात्र गरीब नागरिकांची या दुरवस्थेतून बाहेर पडण्याची आर्थिक ताकद नसल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात हे नागरिक जीव मुठीत घेऊन राहतात. समर्थनगर या सखल भागातील पाणी वाहून जाण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने नाला बांधण्यात आला. पाच फुट रुंदीचा नाला अतिक्रमणामुळे जेमतेम दीड फुट रुंदीचा राहिला असून आजूबाजूचे सांडपाणी आणि पावसाचे पाणी यामुळे थोड्याशा पावसात तुडुंब भरतो. चाळीच्या मागील बाजूला असलेल्या गटारांतील पाणीदेखील नाल्यातून वाहून जात नसल्यामुळे नागरिकांच्या घरात शिरते. दरवर्षी पावसाळ्यात चार ते पाच वेळा नाल्यातील सांडपाणी घरात शिरते. हे पाणी उपसून बाहेर काढण्यासाठी दिवस लागतो, असे अर्चना पाटेकर यांनी सांगितले. सुरुवातीला रुंद असलेला नाला आता गटाराइतकाच उरल्याने हे पाणी शिरत असल्याचा आरोप येथील महिलांनी केला.

वालधुनी नदी परिसरातील चाळी आणि झोपड्याही दरवर्षीच पाण्याखाली जातात. तीन ते चार दिवस ही घरे पाण्याखाली असतात. कंबरेइतक्या पाण्यात दरवर्षी संसार बुडालेला असतो. पावसाचा जोर वाढणार असल्यास सरकारचे अधिकारी, कर्मचारी नागरिकांना त्यांचे सामान घरातच ठेवून इतरत्र राहण्यासाठी नेतात. पावसाचा जोर कमी होताच त्यांना घरी पाठवले जाते. मात्र अतिशय मेहनतीने जोडलेल्या संसारातील वस्तू कधी वाहून जातात, तर कधी पाण्याने सडून जातात. या जगण्याची सवय झाल्याचे पार्वती साळवी यांनी सांगितले.

डोंबिवली

विदारक अनुभव

पावसाळा सुरू होताच डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली भागात श्री स्वामी समर्थ नगरमध्ये दरवर्षी रस्त्यावर पाणी साचते आणि नागरिकांची पायवाट बंद होते. शेकडो रहिवाशांचे त्यात हाल होतात. बुधवारी आलेल्या पावसात श्री स्वामी समर्थांच्या मठातील गाभाऱ्यात असणारे दहा फूट उंच राम मंदिर पाण्याखाली गेले. रहिवाशांनी रात्रभर जागून पंपाने पाणी उपसले. गेली अनेक वर्षे पावसाळ्यात येणाऱ्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार आणि मागण्या करूनही अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने रहिवासी नाराज आहेत. मठ परिसराच्या आजूबाजूला बांधण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींचे अस्वच्छ पाणी दर पावसाळ्यात येथेच साचते. गेली १० वर्षे वास्तव्यास असणाऱ्या अमित परब यांनी सांगितले की, ‘पावसाळ्याचे चार महिने आम्ही जीव मुठीत धरून राहतो. घरातील सगळे सदस्य शाळा आणि कार्यालयातून सुट्ट्या घेऊन घरात बसतो. कारण खाली उतरूच शकत नाही, अशी परिस्थिती असते.’

दोन वर्षांपूर्वी एका वृद्ध महिलेला पावसाळ्यात हृदयविकाराचा झटका आल्यावर तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. त्यावेळी पाणी साचलेले असल्याने अग्निशमन दलाला बोलावून बोटीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. पाणी साचल्याचे केडीएमसीच्या आपत्कालीन समितीला कळवल्यानंतर प्रशासन दोन-तीन माणसांना कुदळ आणि फावडे घेऊन पाठवते. पण नाला किंवा गटार बांधण्यासारख्या कायमस्वरूपी उपायावर काहीच उत्तर मिळत नाही. ‘आम्हाला कुणीच वाली नसेल, तर आम्ही आमच्या समस्या घेऊन जायचे कुणाकडे,’ असा संतप्त सवाल येथील नागरिक विचारत आहेत.

(संकलन – श्रीकांत सावंत, महेश गायकवाड, राजलक्ष्मी पुजारे, गौरी भिडे, शरद पवार, वैष्णवी राऊत)

Source link

- Advertisement -