लंडन: वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी २४२ धावांचे आव्हान दिले आहे. न्यूझीलंडकडून सलामीवीर हेन्री निकोल्सने अर्धशतकी खेळी साकारली. तर टॉम लॅथमने ४७ धावांचं योगदान दिलं. कर्णधार केन विल्यसनने ३० धावा केल्या.
इंग्लंडकडून अॅडम प्लंकेटने किवींच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. सामन्याची नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी स्विकारली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी किवींवर वर्चस्व राखत फलंदाजांना वेसण घातली. ख्रिस वोक्सने मार्टिन गप्टिलला(१९) पायचीत करत इंग्लंडला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसनने सावध खेळ करत मैदानात जम बसवण्याचा प्रयत्न केला. न्यूझीलंडचा डाव सावरत असतानाच प्लंकेटने विल्यमसनला(३०) माघारी धाडलं आणि इंग्लंडला पुन्हा एकदा सामन्यात वर्चस्व प्राप्त करून दिलं. निकोल्सने एक बाजू लावून धरत अर्धशतक पूर्ण केलं. पण प्लंकेटने पुन्हा एकदा इंग्लंडला मोठं यश मिळवून दिलं. प्लंकेटने निकोल्सला ५५ धावांवर क्लीनबोल्ड केलं.
रॉस टेलर देखील यावेळी चांगली कामगिरी करू शकला नाही. मार्क वूडने टेलरला(१५) पायचीत केलं. जिमी निशमने मैदानात येताच जोरदार फटकेबाजी करत न्यूझीलंडच्या धावफलकाला गती प्राप्त करून दिली. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात निशम(१९) जो रुट करवी झेलबाद झाला. अखेरच्या १० षटकांमध्ये टॉम लॅथमने दमदार फलंदाजी करत संघाला दोनशेचा आकडा गाठून दिला.