मुंबई, दि. 19 : पंढरपूर वारी सोहळ्यातील कोणीही वारकरी आरोग्य सुविधापासून वंचित राहू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सर्वार्थाने सज्ज असून, या वर्षी शासनाच्या आरोग्य यंत्रणेबरोबर, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना वारी दरम्यान आपले दवाखानेही सुरु ठेवावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आरोग्य सुविधेबाबत नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत केले.
वारीच्या कालावधीत पंढरपूर परिसरातील व वारी मार्गावरील काही खासगी वैद्यकीय व्यावसायिक आपले दवाखाने बंद ठेवत असल्याचे आढळून आले आहे. शासकीय यंत्रणा सज्ज असली तरी वारी दरम्यान रुग्णसंख्या वाढल्यास वा साथीची परिस्थिती निर्माण झाल्यास उपलब्ध शासकीय यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी आषाढीवारी मार्ग, पंढरपूर शहर व परिसरातील खासगी दवाखाने व रुग्णालये सुरु ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत. वैद्यकीय व्यावसायिकांसमवेत बैठक आयोजित करून रुग्णालये व दवाखाने सुरु ठेवण्याच्या सूचना देण्याबाबत त्यांनी जिल्हास्तरीय यंत्रणांना सूचित केले. तसेच याबाबतची जनजागृती करणे, खासगी रुग्णालये व दवाखाने कार्यरत असल्याची खात्री करण्यासाठी धडक पथके पाठवणे याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. ठोस कारणाशिवाय दवाखाना व रुग्णालये बंद ठेवल्यास साथरोग अधिनियम 1897, साथरोग अध्यादेश 2020 (Amendment) तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये योग्य ती कारवाई करण्याबाबतदेखील सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी वारकऱ्यांच्या सोयीसाठी दवाखाने सुरू ठेवण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी पंढरपूरात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, व देशाच्या इतर भागातून लाखो वारकरी येत असतात. बहुसंख्य वारकरी पायी चालत पंढरपूरला येत असतात, तसेच वारकऱ्यांमध्ये वृद्ध स्त्री व पुरुष भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे वारकऱ्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास त्यांना तत्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत यांचे संकल्पनेतून “आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी” हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत पालखी मार्गावर आरोग्य विभागाने आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध केलेल्या असून वारी मार्गावर फिरत्या वैद्यकीय पथकाची सोयही केलेली आहे. तसेच यात्रेदरम्यान 27 ते 29 जून 2023 या कालावधीत पंढरपूर शहरात भव्य “महाआरोग्य शिबिराचे” आयोजन केलेले आहे. प्रतिवर्षी पंढरपूर यात्रेला सुमारे 15 ते 20 लाख लोक येत असतात.
०००००
निलेश तायडे/विसंअ