पडद्यावर महिला रिक्षाचालक बनून कसं वाटलं? योगिता चव्हाण म्हणते…

पडद्यावर महिला रिक्षाचालक बनून कसं वाटलं? योगिता चव्हाण म्हणते…
- Advertisement -


० ‘मटा श्रावणक्वीन‘ स्पर्धेमुळे करिअरमध्ये मदत झाली?
– मी २०१६ साली मटा श्रावणक्वीन स्पर्धेत सहभागी झाले होते. मराठी इंडस्ट्रीमध्ये मॉडेलिंगची ही एकमेव स्पर्धा असल्यानं इंडस्ट्रीतील अनेक मंडळींचं लक्ष या स्पर्धेच्या निकालाकडे असतं. खरं सांगायचं तर या स्पर्धेनं माझं आयुष्यच बदललं. मटा श्रावणक्वीनमुळेच खऱ्या अर्थानं माझं ग्रूमिंग झालं आणि ऑडिशनसाठीदेखील खूप मदत झाली. यानंतर अनेक ओळखीसुद्धा वाढल्या.

० सध्या करत असलेली अंतरा ही भूमिका योगितापेक्षा किती वेगळी आहे?
– अंतरा आणि योगिता या दोघी एकमेकींपासून प्रचंड वेगळ्या आहेत. अंतरा जे बोलायचं असतं ते ती बिनधास्त बोलते तर योगिता तशी खूप शांत स्वभावाची आहे आणि मला खऱ्या आयुष्यात एकटं राहायला जास्त आवडतं.

० पडद्यावर महिला रिक्षाचालक बनून कसं वाटलं?
– मी महिला रिक्षाचालक म्हणून चित्रीकरण करत असते तेव्हा आजूबाजूला अनेक जण मदतीसाठी असतात. पण खऱ्या आयुष्यात एका महिलेनं हे क्षेत्र निवडणं खूप कठीण आहे. कारण महिला रिक्षाचालक बघून काही लोक त्या रिक्षानं प्रवास करणं पसंत करत नाहीत. तरीही संकटांना सामोरं जात ज्या महिला हे आव्हान पेलतात त्यांना माझा सलाम. खरं तर त्या महिलांमुळेच मला आज ही भूमिका करता येतेय.

० रिक्षा चालवण्याचं आव्हान स्वीकारताना काही अडचणी आल्या का?
– मला आधीपासूनच बाइक चालवता येत होती. त्यामुळे रिक्षा चालवायला शिकणं तितकं कठीण गेलं नाही. खरं तर एका दिवसात मी रिक्षा चालवायला शिकले. पण त्याहूनही कठीण होतं ते म्हणजे अभिनय करत, संवाद बोलताना रस्त्यावर गर्दीत रिक्षा चालवणं. एखाद्या सीनचं चित्रीकरण करताना मी रिक्षा चालवत असले तरी माझ्या मागे टीममधील अनेक जण बसलेले असतात तर त्यांची सुरक्षादेखील मलाच बघायची असते. इतकंच नव्हे तर रिक्षावर कॅमेरासुद्धा लावलेला असतो आणि मलाच अॅक्शन म्हणायचं असतं.

० अभिनयक्षेत्रात येण्याआधी नृत्यांगना म्हणून तुझा प्रवास कसा होता?
– या क्षेत्रात येण्याआधी मी एक बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करायचे. सलमान खान, शाहरुख खान यासारख्या अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. दिवंगत ज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान यांनी नृत्यदिग्दर्शित केलेल्या शोमध्ये मी काम केलं आहे. ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमामध्येही मी सहभागी झाले होते. यापुढेही नृत्याची आवड मी जोपासणार आहे. मला कथक शिकायला नक्की आवडेल.



Source link

- Advertisement -