Home शहरे कोल्हापूर पन्हाळा किल्ला परिसरात जोरदार पावसाने वाघबीळ ते पन्हाळगड वाहतूक बंद

पन्हाळा किल्ला परिसरात जोरदार पावसाने वाघबीळ ते पन्हाळगड वाहतूक बंद

0

कोल्हापूर : पन्हाळागड परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांना अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गडावर राहणारे आणि गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वाड्या-वस्त्यांत राहणारे नागरिक भीतीयुक्त वातावरणात वावरत आहेत. मुसळधार पावसामुळे गडावर आणि परिसरात पाणीच पाणी झाले असून पायथ्याला राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. यावर्षी पहिल्यांदा गडाच्या पायथ्याशी असणारा बुधवारपेठ ते पन्हाळागडादरम्यानचा मुख्य रस्ता खचला आहे. त्याचबरोबर दरड कोसळून दगड आणि चिखल रस्त्यावर येऊन पडत आहेत. यामुळे वाघबीळ ते पन्हाळगड वाहतूक बंद करण्यात आली असून पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या बुधवारपेठ, नेबापूर, आपटी या गावांना धोका निर्माण झाला आहे.

पन्हाळा हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे परिसरातील नागरिकांची सर्वच शासकीय कार्यालयात मोठी वर्दळ असते. आता गडाचा रस्ताच बंद झाल्याने शासकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाता येत नसल्यामुळे नागरिकांच्या शासकीय कामांचा खोळंबा होणार आहे. सतत पडणारा पाऊस, दरडी कोसळणे यामुळे सध्या तरी या रस्त्याची दुरुस्ती करणे शक्य नाही. यामुळे पन्हाळ्यावरील सर्वच शासकीय कार्यालयाबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार, ते पाहावे लागेल. तोपर्यंत सर्वांनाच पन्हाळगडाचे दरवाजे बंद राहतील.