पाट येथे वनराई बंधारा उभारणीत मंत्री दादाजी भुसे यांचे श्रमदान – महासंवाद

    - Advertisement -

    सिंधुदुर्ग, दि. ७ : जिल्ह्यात लोकसहभागातून सुरू असलेल्या वनराई बंधारा निर्मितीच्या कामातून राज्यातील इतर जिल्ह्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. पाट येथील एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांसोबत वनराई बंधारा उभारणीच्या श्रमदानात सहभागी होत त्यांनी जलसंधारणाचा संदेश दिला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांनीही श्रमदान केले.

    ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत पाट येथील शाळेला भेट दिल्यानंतर मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वनराई बंधारा उभारणीच्या कामाची पाहणी केली. जलसंधारणाची कामे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी न राहता विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. लोकसहभागातून उभारले जाणारे बंधारे पाणी अडविण्यासोबतच जलसाक्षरता आणि पर्यावरण संवर्धनाची चळवळ व्यापक करण्यासाठी उपयुक्त ठरतील, असेही त्यांनी नमूद केले.

    शाळेतील शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि सामाजिक जबाबदारीचे प्रत्यक्ष धडे देणारे असावे, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन पाणी संवर्धनाचा संदेश कुटुंब आणि समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी बंधाऱ्यालगतच्या भातशेतीचीही पाहणी केली.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंधारणासाठी लोकसहभागातून सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक करताना मंत्री भुसे यांनी अशा कामांना सातत्याने चालना देण्याची आवश्यकता व्यक्त केली. पाणी अडवा, पाणी जिरवा आणि जलस्रोतांचे संवर्धन करा, हा संदेश विद्यार्थ्यांच्या सहभागातून अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    ०००००

    - Advertisement -