पालघरमधील पूरस्थितीची मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी

पालघरमधील पूरस्थितीची मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी
- Advertisement -


पालघर/ मुंबई, दि. ७ : पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे  गावांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी पालघर जिल्ह्याचा दौरा करून पूरस्थितीचा आढावा घेतला.  प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदत व बचावकार्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

दौऱ्यादरम्यान मंत्री महाजन यांनी जव्हार, मनोर तसेच जिल्ह्यातील विविध पूरग्रस्त भागांना भेट दिली. अतिवृष्टीमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला तसेच पालघर–जव्हार मार्गावरील विक्रमगड तालुक्यातील पाचमाड नाल्यावरील उड्डाणपुलाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली.

यावेळी खासदार हेमंत सावरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जव्हारच्या प्रांताधिकारी अपूर्वा बासुरे, सहायक जिल्हाधिकारी अमोल पी., जलसंपदा विभागाच्या अभियंता वैशाली नारकर, वाडा येथील प्रांताधिकारी संदीप चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी सांगितले की, प्रशासनाने आतापर्यंत सुमारे १,२०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले असून त्यांची तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. या नागरिकांना अन्न, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी मंत्री महाजन यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पूरग्रस्त भागातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षितस्थळी हलविणे, जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेणे तसेच मदत व बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पालघर जिल्ह्यात वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीची कारणमीमांसा करून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नामांकित संस्थेच्या सहकार्याने वैज्ञानिक अभ्यास केला जाणार आहे. यासाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्यात येणार असून, त्याच्या अहवालाच्या आधारे शासन दीर्घकालीन उपाययोजना राबविणार असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिली.

यानंतर मंत्री महाजन यांनी माहीम–केळवा (झांझरोली) धरणाचीही पाहणी केली. मुसळधार पावसामुळे धरणाच्या मातीभरावावरील अश्मपटल (पिचिंग) काही ठिकाणी ढासळल्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी त्यांनी मात्रेवाडी तसेच केळवा–माहीम धरणालगतच्या गावांतील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गावकऱ्यांच्या मागणीनुसार दोन वस्त्यांना जोडणारा पूल उभारण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

राज्य शासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून, पालघर जिल्ह्यातील पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील, असेही मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले.

०००



Source link

- Advertisement -