इंदूर : जीर्ण झालेली इमारत पाडायला आल्यामुळे पालिका अधिकाऱ्याला भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांचे पूत्र आणि आमदार आकाश विजयवर्गीय यांनी बॅटने मारहाण केली होती. या प्रकरणी आकाश यांना भोपाळच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हा अधिकारी गंभीर जखमी झाला असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. इंदूर परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्यामुळे, या परिसरातील जुन्या जिर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना आकाश विजयवर्गीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. यादरम्यान स्वतः आकाश हे अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. आकाश इंदूर- ३ मतदारसंघातून आमदार आहेत.
या प्रकरणी आकाश विजयवर्गीय यांना 7 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, विजयवर्गीय यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू होते. सरकारी अधिकाऱ्याला मारहाण झाल्यामुळे इंदूरच्या न्यायालयाने जामीन फेटाळला होता. अखेर विजयवर्गीय यांनी भोपाळच्या विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
प्रकरण काय?
जुन्या जिर्ण झालेल्या घरांना तोडण्यासाठी अधिकारी आल्यावर स्थानिकांनी आकाश यांना बोलावले. त्यानंतर अधिकारी आणि आकाश यांच्यात घर पाडण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. त्यानंतर आकाश यांच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीची चावी काढून घेतली. तुम्हाला १० मिनटांचा वेळ देतो येथून निघून जा नाहीतर जे होईल त्याची जबाबदारी तुमची असेल, अशी धमकी आकाश यांनी अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर आकाश यांनी बॅटने अधिकाऱ्यांना मारणे सुरू केले. यावेळी पोलिस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कसे-बसे अधिकाऱ्याला तेथून बाहेर काढले.